गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, लांजा तालुक्यातील पहिली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:33 PM2022-10-10T13:33:10+5:302022-10-10T13:33:41+5:30
गव्याने वृद्धा हल्ला केल्यानंतर माचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लांजा : भातशेतीला बांधणीसाठी लागणारे बंध काढण्यासाठी जंगलात गेलेल्या भिकाजी राघव मांडवकर या ७० वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना लांजा तालुक्यातील माचाळ येथे रविवारी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. गव्याने हल्ला केल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
सध्या भात कापणीची लगबग सुरु आहे. भात बांधणीसाठी लागणारे बंध काढण्यासाठी माचाळ येथील भिकाजी मांडवकर हे वाडीतील सात ते आठजणांसह माचाळ ते प्रभानवल्ली जंगलामध्ये दुपारी गेले हाेते. झाडाचे बंध काढत असतानाच गवा रेड्याने भिकाजी मांडवकर यांच्यावर हल्ला चढवला.
त्यांच्या पोटामध्ये गव्याने शिंग खुपसून त्यांना उडवून दिले. या हल्ल्यात मांडवकर हे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या मांडवकर यांना त्यांच्यासाेबत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने जंगलाबाहेर आणले. तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाला दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक विक्रम कुंभार, संजय रणधीर यांनी घटनास्थळी भेट दिली. गव्याने वृद्धा हल्ला केल्यानंतर माचाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.