जुनी पेन्शन योजना: संतप्त संपकऱ्यांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद
By शोभना कांबळे | Published: March 20, 2023 12:57 PM2023-03-20T12:57:06+5:302023-03-20T12:57:34+5:30
संपामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले असतानाच अद्याप शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही
रत्नागिरी : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यस्तरीय संप सुरू आहे. सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प होऊनही याबाबत अद्याप शासनाची डोळेझाकपणाची भूमिका असल्याने संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत शासनाचा निषेध केला.
जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
या संपामुळे सर्व कामकाज ठप्प झालेले असतानाच अद्याप शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी कर्मचाऱ्यांनी थाळी नाद केला.