जुनी पेन्शन योजना: रत्नागिरीत संपकऱ्यांनी थाळीनाद करून केला शासनाचा निषेध
By शोभना कांबळे | Published: March 17, 2023 06:35 PM2023-03-17T18:35:43+5:302023-03-17T18:36:07+5:30
सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प
रत्नागिरी : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठीचा राज्यस्तरीय संप शुक्रवारी चाैथ्या दिवशीही सुरूच आहे. सर्व शासकीय कार्यालये, आरोग्य विभागाचे काम ठप्प होऊनही याबाबत अद्याप शासनाची डोळेझाकपणाची भूमिका असल्याने संतप्त झालेल्या संपकऱ्यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
जुनी पेन्शन योजना लागू करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागांतील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता द्या, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करा, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द करा, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
सर्वच शासकीय खात्यातील कामगार, कर्मचारी या संपात मंगळवारपासून सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही या संपात सहभाग आहे. त्यामुळे शासनाची आरोग्य यंत्रणाही आता कोलमडली आहे. सामान्य जनतेची शासकीय कामे खोळंबली आहेत. मात्र, त्याचे सरकारला कोणतेच सोयरसुतक नसल्याचा आरोप या संपकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक कार्यालयांचे नियमित कामकाज ठप्प झाले असून, केवळ अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यालयांचा भार आहे. मात्र, शासनाला या संपाची दखल घेण्याची गरज वाटत नाही. याबद्दल या संपकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संपकऱ्यांनी थाळीनाद करत, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला.