जुनाट जलवाहिन्या हीच समस्या...!
By admin | Published: February 9, 2015 11:05 PM2015-02-09T23:05:07+5:302015-02-10T00:00:52+5:30
महत्त्वाचे शहर : पाणी व्यवस्थापनाची यंत्रणाच कोलमडली
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -विस्तारणारे, प्रगतीकडे झेपावणारे कोकणातील एक महत्त्वाचे शहर अशी ओळख असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या चार वर्षांच्या काळात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. धरणांत मुबलक पाणी आहे, परंतु ते शहरवासीयांना मिळण्यात अडचणी आहेत. शहरवासीयांना पाण्याचे वितरण करणारी व्यवस्थाच कोलमडली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहरांतर्गत जुनाट झालेल्या सर्वच जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच धरणांमध्ये असलेले मुबलक पाणी शहरवासीयांच्या मुखात जाणार आहे. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७७ हजारांवर आहे. तसेच हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज तालुक्यातून, जिल्ह्यातून कामानिमित्त येणाऱ्या तसेच जिल्हा राजधानीत नोकरीस असलेल्या व शहराच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची संख्या आणखी काही हजारांवर आहे. या अधिकच्या लोकसंख्येचा भारही रत्नागिरीवर आहे. त्यामुळे सुमारे सव्वा लाख लोकांच्या रत्नागिरी शहरात पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम असण्याची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या चार ते पाच वर्र्षांच्या काळात नगरपरिषदेत अपवादवगळता केवळ राजकारणच झाले. त्यामुळे नागरिक टाहो फोडत असतानाही त्यांच्या पाण्याची समस्या मात्र सुटू शकली नाही. उलट ही समस्या दरवर्षी अधिकाधिक वाढत आहे.
रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरण, नाचणे तलाव व एमआयडीसी यांच्याकडील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. दररोजची शहराची पाण्याची गरज ही १४ ते १५ दशलक्ष लीटर्स (एमएलडी)ची आहे. शीळ धरणातील जॅकवेलमधून दररोज १० ते ११ एमएलडी पाणी साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्रात आणून शुध्दिकरण केले जाते. त्यानंतर ते शहरवासीयांना पुरविले जाते. हे पाणी रत्नागिरीत आणण्यासाठी नगरपरिषदेला दर महिन्याला १७ लाख वीजबिल भरावे लागते. पानवल धरणातून दीड ते पावणेदोन एमएलडी पाणी शहरात येते. हे पाणी गुरुत्त्वाकर्षण पध्दतीने येत असल्याने त्यासाठी विजेचा खर्च येत नाही.
शहराजवळच असलेल्या नाचणे येथील तलावाचे पाणीही शहराला काही प्रमाणात उपलब्ध होते. तसेच एमआयडीसीकडून शहराच्या काही भागासाठी दीड एमएलडी पाणी घेतले जाते. त्यामुळे शहरवासीयांसाठी या धरणांमध्ये मुबलक पाणी आहे. परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या जलवाहिनीचे जाळेच कमकुवत, जुनाट झाले आहे.
दररोज शहरातील काही भागात जलवाहिनीतील दोषामुळे पाणी न येणे, कमी दाबाने पाणी येणे, जलवाहिनी फुटणे हे प्रकार घडतात व तेथील महिलावर्ग पाणी नाही म्हणून थेट नगरपरिषदेच्या कार्यालयावर धडक देतात.
यावर्षीही ही स्थिती निर्माण झाली असून, जलवाहिन्याच एवढ्या गंजलेल्या आहेत की त्या कधी कुठे फुटतील, याचा नेम नाही. त्यामुळे आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार अशी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची स्थिती झाली आहे.
समस्या दूर होणार?
शासनाच्या सुजल निर्मल योजनेतून गेल्या वर्षभराच्या प्रयत्नांनंतर आता कुठे पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी, पाण्याची स्थिती भक्कम करण्यासाठी नगरपरिषदेला ५७ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील साडेआठ कोटी रुपये हे पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी खर्च केले जाणार आहेत. शीळ धरणातील ५० टक्केच पाणी रत्नागिरी शहराला मंजूर होते ते आता शंभर टक्के मिळणार आहे. तसेच शीळ धरणातील जॅकवेल २००५ मध्ये काही कारणाने खचली असून, या जॅकवेलची दुरुस्तीही शासनाच्या येणाऱ्या निधीतून केली जाणार आहे. खरेतर नव्याने जॅकवेल उभारण्याची गरज असून, स्वतंत्रपणे निधी मिळाल्यावर नवीन जॅकवेल उभारली जाणार आहे.
जुनाट जलवाहिन्या बदलणार...
रत्नागिरी शहरातील जुने झालेले अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळेही येत्या सहा महिन्यांच्या काळात शासनाच्या निधीतून बदलले जाणार आहे. त्यामुळे वितरणातील अनेक दोष आपोआपच कमी होणार आहेत. शीळ धरणापासूनची दोन किलोमीटर अंतराची जलवाहिनीही शासनाकडूून मिळणाऱ्या ५७ कोटी रुपयांच्या निधीतून बदलली जाणार आहे. येत्या वर्षभराच्या काळात रत्नागिरीवासीयांची पाण्याची समस्या बहुतांश सुटेल, असा विश्वास नगरपरिषदेच्या पाणी विभागाचे अधिकारी चंद्रकांत गमरे यांनी व्यक्त केला.