ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 04:52 PM2021-01-07T16:52:48+5:302021-01-07T16:53:46+5:30
Olive Ridley turtles wildlife Ratnagiri- हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.
मंदार गोयथळे
असगोली : हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कद्रे, लाडघर, पाडले, मुरुड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी आणि राजापूर तालुक्यातील माडबन व वाडावेत्ये या १४ गावांतील समुद्र किनाऱ्यांवर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम राबवली जाते.
२०१९-२०२० या कालावधित रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर ६५२ घरट्यातील ६५८५३ अंडी वन विभागाने संरक्षित केली होती. त्यापैकी ३२४३३ अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात वन विभागाला यश आले. यावर्षीही वन विभागाने जिह्यात कासव संवर्धन मोहिमेची तयारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू केली. परंतु, डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ किनाऱ्यांपैकी एकाही किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत.
याबाबत बोलताना ऑलिव्ह रिडले जीवनचक्र अभ्यासक माधव मुधोळ म्हणाले की, मुळात गेल्या तीन-चार वर्षांचा अभ्यास केला, तर अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे लक्षात येत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचे सामान्य कारण असल्याचे ते म्हणाले. बदलत्या वातावरणामुळे पक्षी-प्राण्यांच्या आयुष्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत, हेच यातून दिसत आहे.
हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडली अंडी
नाताळच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे घरटे वन विभागाला सापडले आहे. या घरट्यातून १३८ अंडी संरक्षित करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर या हंगामात सापडलेले हे पहिले घरटे आहे. जानेवारी महिन्यापासून कोकण किनारपट्टीवर विणीचा हंगाम सुरू होईल, असा अंदाज आहे.
निसर्ग वादळामुळे समुद्रही ढवळून निघाला. त्यानंतरही पश्चिम उत्तर समुद्रात दोनवेळा चक्रीवादळ झाले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी उशिरा पडली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला. या सर्वांचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावरही झाला आहे. ती इतस्तत: विखुरली गेल्याने त्यांच्या मीलनाचा काळ लांबला. स्वाभाविकच अंडी घालण्याचा काळही लांबला आहे. जानेवारीत विणीचा हंगाम सुरू होईल.
- माधव मुधोळ,
अभ्यासक