ओंकार पतसंस्था घोटाळा; व्यवस्थापिकेवर अखेर गुन्हा दाखल
By admin | Published: August 3, 2016 12:44 AM2016-08-03T00:44:16+5:302016-08-03T00:44:16+5:30
अपहार झाल्याचे आॅगस्ट महिन्यात उघडकीस
देवरुख : सातत्याने आॅडिट ‘अ’ वर्गात असलेल्या देवरूख शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अपहार झाल्याचे आॅगस्ट महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर आजपर्यंत शासकीय लेखापरीक्षण चालू होते. मात्र, शासकीय लेखापरीक्षण अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचे पाहून संचालक मंडळाने पॅनेलवरील लेखा परीक्षकांकडून अंतर्गत लेखा परीक्षण करुन घेऊन देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तत्कालीन व्यवस्थापिका वासंती अनिल निकम - केदारी (४०) देवरुख हिच्यावर २ कोटी ५५ लाख ७४ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेतील सभासदांच्या ठेवी पावत्यांवर कर्जे काढून हा अपहार १ एप्रिल ते २०११ ते २४ आॅगस्ट २०१५ या कालावधीत करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन व्यवस्थापिका वासंती निकम-केदारी हिने बनावटीकरण करुन संस्थेचा न्यास भंग केल्याप्रकरणी व्यवस्थापिकेवर सोमवारी रात्री उशिरा देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला केला आहे.
ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, देवरुख या पतसंस्थेत ठेवींवरच जादा कर्ज घेतल्याचे संचालक मंडळाच्या लक्षात आल्यानंतर याविषयी मंडळाने बारकाईने अभ्यास केल्यानंतर मोठा अपहार झाला असल्याचे संचालक मंडळाच्या लक्षात आले. १४ आॅगस्ट रोजी ठेवींवर बनावटरित्या कर्जे घेऊन अपहार झाल्याचे ठामपणे संचालक मंडळाच्या लक्षात आले. त्यावेळी देवरुखमध्ये एकच उलटसुलट चर्चा ऐकायला येत होती. याचवेळी संचालकांनी पत्रकार परिषद बोलावून अपहार झाल्याची माहिती जाहीर केली.
यावेळी काही ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात आल्या. बहुतांश ठेवीदारांना समजावण्यात आले. याच काळात या अपहाराला व्यवस्थापिका निकम हिला दोषी ठरवून व्यवस्थापिका पदावरुन निलंबित करण्यात आले.
अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संचालक मंडळाने याप्रकरणी अनेक बैठका घेतल्या. तज्ज्ञांची मते जाणून घेतली. तसेच ६ सप्टेंबरदरम्याने पतसंस्थेचे शासकीय लेखा परीक्षण व्हावे, यासाठी जिल्हा निबंधकांकडे रितसर अर्ज करुन लेखा परीक्षणाची मागणी केली. मात्र, शासकीय लेखा परीक्षणातील अनियमितपणा आणि अत्यंत धीम्या पध्दतीने चाललेले शासकीय लेखा परीक्षण वर्षभरात पूर्णत्त्वास जाईल, अशी शक्यता नसल्याने संचालक मंडळाने पॅनेलवर असणाऱ्या लेखा परीक्षक प्रभात तेंडुलकर यांच्याकडून अंतर्गत खासगी लेखा परीक्षण करुन घेतले. हे लेखा परीक्षण हाती मिळाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी आणि संचालक मंडळ यांनी पोलिसांना अहवाल दिला आणि तक्रार घेण्याविषयी सांगितले. मात्र, शासकीय लेखा परीक्षणाची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी आणि मंडळाने आपले म्हणणे अखेर देवरुख न्यायालयात मांडले आणि याविषयी रितसर लेखी तक्रार केली.
याबाबत देवरुख पोलिसांना तक्रार दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर सोमवारी व्यवस्थापिका निकम हिच्या विरुध्द देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६७, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत. पोलिसांनी निकम यांच्या घराची मंगळवारी झाडाझडती घेतली. देवरुखात दिवसभर महिला पोलिसांची तुकडी तैनात होती. (प्रतिनिधी)
व्यवस्थापिका वासंती निकम-केदारी या १९९५पासून २४ आॅगस्ट २०१५ पर्यंत पतसंस्थेत कार्यरत होत्या. या अपहारामुळे तिला निलंबित करण्यात आले.
हा अपहार अन्य ठिकाणांहून महिन्याला मिळणाऱ्या जादा व्याजासाठी होत होता काय? आणि तसे असेल तर त्या मुळापर्यंत जाऊन त्या मुळाचीच पाळेमुळे खणून काढावीत, अशीही भावना पतसंस्थेच्या मंडळाने तक्रारीत नमूद केली आहे. त्यामुळे जादा व्याज देणाऱ्यांवरही कारवाई अटळ आहे.