स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:04 PM2022-08-17T12:04:01+5:302022-08-17T12:04:24+5:30

सैन्य दलातील जवानांच्या शौर्याचा सर्वात अधिक सन्मान करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

On Independence Day Army performance must be saluted says Industries Minister Uday Samant | स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

स्वातंत्र्यदिनी सैन्य दलाच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाच पाहिजे : उद्योगमंत्री उदय सामंत

googlenewsNext

रत्नागिरी : हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे सैनिक व त्यांच्या वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनी आवर्जून होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य अनमोल आहे त्यासाठी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम हे समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित शौर्य पदक विजेते सैनिक तसेच सैनिकांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी सुशांत खांडेकर, शौर्य पदक धारक कमांडो मधुसूदन सुर्वे तसेच जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक घाणेकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

आजवरच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर हा सन्मान सोहळा झाला.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, अशा स्वरूपात सैन्य दलातील जवानांच्या शौर्याचा सर्वात अधिक सन्मान करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. दरवर्षी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर असा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा ज्याचा इतर जिल्ह्यांनाही सकारात्मक संदेश जाईल व सर्व जिल्हा पातळीवर इतकंच नव्हे तर देशपातळीवर सैनिकांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली जाईल.

वेगवेगळ्या युद्धात बलिदान देणारे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे याला जिल्हा प्रशासनाने पुस्तक रूपाने पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याची गरज आहे.

वीर सैनिकांच्या माता आणि पत्नी यापैकी २५ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे इन्फीगो नेत्रालयाचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी मान्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या मदतीने या सर्वांसाठी एखाद्या शिबिराच्या माध्यमातून असे आयोजन करावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

सैन्य दलातील सेवा पूर्ण करून राज्यात परतणाऱ्या सैनिकांना उद्योग तसेच इतर क्षेत्रात सेवा द्यायची असेल तर त्या संदर्भात शासनाच्या वतीने आपण सकारात्मक आहोत,असे सांगून सामंत म्हणाले की, याबाबतचे निर्देश लवकरच आपण जारी करू. सैनिक कुटुंबीयांच्या अडीअडचणी अनेक आहेत त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या स्तरावर एक बैठक लवकरच घेऊन त्या संदर्भातही निर्णय घेतले जातील.

या कार्यक्रमात जिल्ह्यातून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ७५ विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुणगौरव करण्यात आला.

जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरीतील पर्यटन क्षेत्राची वाढ व्हावी व पर्यटकांची मदत व्हावी याकरिता एक परस्पर संवादी अर्थात इंटर ॲक्टिव्ह संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे लोकार्पणही उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमात झाले.

Web Title: On Independence Day Army performance must be saluted says Industries Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.