दिवाळी पहाटला तरुणांनी घेतला कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:25 PM2022-10-29T12:25:53+5:302022-10-29T12:26:20+5:30
कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली.
रत्नागिरी : खरेतर दिवाळी पहाटेला शहरी संस्कृतीत गाण्यांच्या मैफिली आयोजित केल्या जातात, मात्र सड्ये गावातील शालेय मुले, तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सड्यावर पदयात्रा काढून प्राचीन कातळशिल्प, रखरखीत कातळावरील बाराही महिने पाणी देणारे पाणवटे, आडवाटांवरील दुर्गम देवतांचा शोध घेतला. यावेळी कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, या हेतूने त्यांना संरक्षण व रेखाचित्रणही करण्यात आले.
सड्ये गावातील मुले, तरुणांनी ही पदयात्रा पार पडली. गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ताराम खवळे आणि अनंत धुमक यांनी या पदयात्रेच्या आडवाटांचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला माचाण या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर सोमेश्वर देवस्थानच्या देवराईला भेट देण्यात आली. गुराख्यांचे अर्थात जांगल्यांचे देवस्थान असलेल्या जांगलदेव याठिकाणी भेट देण्यात आली. कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली. रखरखित उन्हातल्या या टाक्यांमध्ये आजही बारा महिने थंडगार पाणी टिकून असल्याचे दिसले.
कातळशिल्प हा कोकणच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. सड्ये-पिरंदवणेच्या सड्यावरिल कातळशिल्प शोधण्याचा यावेळी मुलांनी प्रयत्न केला. यावेळी ‘भेकर’ हा प्राणी आणि ‘माणूस’ ही दोन कातळशिल्पे सड्यावरील कातळात आढळली. मुलांनी त्यावरील माती, रान काढून साफ केली व त्यांच्या रेखांना रंगकाम करुन ती सुस्पष्ट केली. तसेच त्यांचे संवर्धन व्हावे, याकरिता त्यांना दगडी संरक्षण केले.
त्यानंतर कोकणातील प्रमुख मातृदेवता श्री भराडीण क्षेत्राला भेट देण्यात आली. याठिकाणच्या कातळावर असलेल्या ३५ फूट लांब असलेल्या आडालाही भेट देण्यात आली. याही आडात बाराही महिने पाणी असते. भराडणीची घाटी उतरुन टोळवाड परिसरातील पेशववकालीन उजव्या सोंडेचे माेरेश्वर देवस्थान तसेच भावे आडम गावचे देवस्थान श्री सप्तेश्वर या देवस्थानाला भेट देण्यात आली. याचठिकाणी क्षेत्रदेवता म्हणून वसलेल्या जाखमाता देवस्थानाला भेट देण्यात आली.
त्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली. अनंत धुमक, मारुती धुमक, अमोल पालये यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेत हितेश नार्वेकर, सुरज माने, गुरुनाथ धुमक, रोशनी पालये यांच्यासह शालेय विद्यार्थी, तरुण सहभागी झाले होते.