‘स्वच्छता ही सेवा’; रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या हातात झाडू

By शोभना कांबळे | Published: September 30, 2023 06:45 PM2023-09-30T18:45:47+5:302023-09-30T18:46:17+5:30

रत्नागिरी : वेळ सकाळी ७ ची. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० फुटी ध्वजस्तंभ. प्रत्येकाच्या हातात झाडू, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, अनावश्यक ...

On the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary, under the 'Swachhata Hi Seva' initiative, Ratnagiri Collector, Superintendent of Police took a broom and carried out cleanliness | ‘स्वच्छता ही सेवा’; रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या हातात झाडू

‘स्वच्छता ही सेवा’; रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या हातात झाडू

googlenewsNext

रत्नागिरी : वेळ सकाळी ७ ची. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० फुटी ध्वजस्तंभ. प्रत्येकाच्या हातात झाडू, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, अनावश्यक वाढलेली झाडे अन् बघता बघता कचऱ्याचा ढीग जमू लागला. प्रत्येक जण झपाटल्यासारखा साफसफाई करत होता. औचित्य होते स्वच्छता पंधरवडा, महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत कार्यालयीन स्वच्छतेचे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शनिवारी श्रमदान केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात महिला अधिकारी, कर्मचारीही आघाडीवर होत्या.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, परीविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रविवारी पुन्हा ‘एक तारीख, एक तास’ निमित्ताने शहर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. यामध्ये सर्वांनीच सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छता ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करायला हवी. पर्यायाने आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ बनेल. अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर आहे. इतर जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालयातील कोपरे आणि भिंती रंगलेल्या पाहायला मिळतात. असा प्रकार इथे जवळपास नाही. जिल्ह्याचे नागरिकही स्वच्छतेला महत्त्व देतात. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्यासारखे अधिकारी आपल्या परिसराचे सुशोभीकरण करून वेगळे अस्तित्व निर्माण करतात. इतर अधिकाऱ्यांनाही याचे अनुकरण करावे, असे ते म्हणाले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांसह आपल्या कार्यालयाची स्वच्छता केली. चिपळूण वन विभाग, महावितरण नाचणे उपकेंद्र, मत्स्य विभाग, हार्बर डिव्हिजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती रत्नागिरी, लांजा, चिपळूण, राजापूर तहसील, प्रांत कार्यालय, खेड, दापोली, तहसील, प्रांताधिकारी, गुहागर लांजा, मंडणगड, संगमेश्वर, रत्नागिरी तहसील कार्यालय आदी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रत्नागिरीतील स्वच्छता मोहिमेत रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, सर्व स्वच्छता कर्मचारी, तहसीलदार सामान्य प्रशासनाचे तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, स्वीय सहायक संदीप सावंत सहभागी झाले होते.

पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालयाची स्वच्छता

स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने पोलिस अधीक्षक कार्यालयाचीही स्वच्छता करण्यात आली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय परिसराची स्वच्छता केली.

Web Title: On the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary, under the 'Swachhata Hi Seva' initiative, Ratnagiri Collector, Superintendent of Police took a broom and carried out cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.