देशाच्या एकतेसाठी रत्नागिरीकरांची 'रन फॉर युनिटी'
By शोभना कांबळे | Updated: October 31, 2023 13:50 IST2023-10-31T13:48:46+5:302023-10-31T13:50:35+5:30
भारतीय तटरक्षक वायु दलाच्या दाैडमध्ये ३५० जणांचा सहभाग

देशाच्या एकतेसाठी रत्नागिरीकरांची 'रन फॉर युनिटी'
रत्नागिरी : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीदिनाचे आैचित्य साधून, भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या मार्फत मंगळवारी 'रन फॉर युनिटी' उपक्रम आयोजित करण्यात आला. या दाैडमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभाग, विद्यार्थी आणि नागरिकांसह ३५० जणांचा समावेश होता.
'रन फॉर युनिटी' ची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून झाली. भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, रत्नागिरी चे कमांडट विकास त्रिपाठी यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर मारुती मंदिर येथून सुरवात होऊन भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या कार्यालयात या उपक्रमाची सांगता झाली.
या उपक्रमात पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण रेल्वे, गद्रे मरीन लिमिटेड, एमईएस, नवनिमार्ण विद्यालयाचे विद्यार्थी, आयकेआरए इंग्लिश मिडीयम स्कूल, कस्टम विभाग, फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, मराठा बिल्डर्स, आरपीफ, अरिहंत ग्रुप आदींसह कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक असे सुमारे ३५० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते.