दीड कोटीचे रक्तचंदन जप्त
By admin | Published: January 1, 2017 11:05 PM2017-01-01T23:05:25+5:302017-01-01T23:05:25+5:30
चिपळुणमध्ये कारवाई : समुद्रमार्गे आणल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज
चिपळूण/अडरे : चिपळूणमध्ये रक्तचंदनाच्या तस्करीवर सलग तिसरा छापा टाकण्यात आला असून, यावेळी सर्वांत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरातील गोवळकोट परिसरात तीन ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून दोन दिवसांत दीड कोटीचे रक्तचंदन ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची किंमत १० कोटींच्या घरात आहे. चिपळुणातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही राज्यातील सर्वांत मोठी कारवाई आहे. रक्तचंदनाची महाराष्ट्रातून समुद्रमार्गे विदेशात तस्करी करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.
दि. ३० डिसेंबरला चिपळूण शहरातील गोवळकोट येथे आफ्रिन पार्क येथील अलमक्का अपार्टमेंटमधील समीर शौकत दाभोळकर यांच्या गाळ्यामध्ये रक्तचंदनाचे ९२ नग जप्त करण्यात आले. त्याचे वजन २.८५० टन असून, किंमत सुमारे ४० लाख रुपये एवढी आहे. तसेच ३१ डिसेंबरला दुपारनंतर गुहागर बायपास रोड येथे मिरजोळी गावच्या हद्दीत तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कागदामध्ये झाकून ठेवलेले ७२ नग, सात सोफासेटमध्ये पॅक केलेले ३२ नग असे एकूण १०४ नग जप्त केले. त्यांचे वजन ३.०८० टन इतके असून त्याची किंमत सुमारे ४० ते ५० लाख रुपये आहे. त्याच रात्री म्हणजे शनिवारी रात्री गोवळकोट रोड आफ्रिन पार्क येथे अलअब्बास या नवीन अपार्टमेंटमधील तळमजल्यातील ३ गाळ्यांमध्ये एकूण ३० सोफासेट आढळले असून, त्यात ११६ रक्तचंदनाचे नग जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ५० लाखापर्यंत आहे. या तीनही छाप्यांमध्ये मिळून दीड कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.
अलअब्बास या अपार्टमेंटचे गाळा मालक अल्ताफ चिकटे यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे. चिपळुणातील वन अधिकाऱ्यांनी सर्वांत मोठी कारवाई केली असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वन अधिकारी दक्षता कोल्हापूरचे विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे वन क्षेत्रपाल सुरेश वरक, फिरत्या पथकाचे वन क्षेत्रपाल शहाजी पाटील, वनपाल रंगराव पाताडे, रामपूर विभागाचे वनरक्षक रामदास खोत, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक रानबा बंबर्गेकर, उमेश आखाडे, फिरत्या पथकाचे वनपाल किशोर पत्की, वनरक्षक मिताली कुबल, अमित निमकर, यशवंत सावर्डेकर, उदय भागवत आदींनी ही कारवाई केली.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशिष्ट तंत्रशुद्ध पद्धतीने लाकडी सोफा तयार करून त्याच्या आतमध्ये नटबोल्ट व जर्मन पट्टीच्या साहाय्याने रक्तचंदन बांधण्यात आले होते. काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी चार नग लपवून ठेवण्यात आले होते. चिपळूण वन अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच तिन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणी संशयित ईसा हळदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणी वन विभागाने भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील संशयित हळदे याला वन विभागाने नोटीस बजावली असून सध्या तो फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.
ही माहिती मिळताच चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी वन विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली व अभिनंदन केले. (वार्ताहर)
परदेशात मागणी
या रक्तचंदनाला फ्रान्स, जर्मनी, जपान या देशांत मोठी मागणी असते. रक्तचंदनाचा उपयोग त्या ठिकाणी औषधासाठी केला जातो.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
दोन दिवसांत तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून दीड कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा सापडला आहे. यात फार मोठे रॅकेट असून, ते लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा वनखात्याकडून व्यक्त केली जात आहे.