सावर्डे येथे पकडला जनावरे नेणारा टेम्पो, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:50 PM2020-01-24T12:50:26+5:302020-01-24T12:54:58+5:30
खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
चिपळूण : खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गतवर्षी २६ जानेवारी रोजी खेड - लोटे येथे गोवंश हत्येची घटना घडली होती. या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाच चिपळूण तालुक्यातील कामथे - हरेकरवाडी स्टॉपजवळ गोवंश हत्या झाल्याची घटना घडली होती. ज्याठिकाणी हत्या झाली त्याठिकाणी बाजूलाच पावट्याची शेती असून, शेतकरी रवींद्र उदेग हे शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.
ही घटना समजताच याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच २१ जानेवारी रोजी सकाळी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याठिकाणी कापलेल्या जनावरांच्या अवशेषाबरोबरच रक्ताचा सडाही पडलेला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक दोरखंड सापडला असून, हा दोरखंड जप्त करण्यात आला आहे.
लोटे, कामथे येथील घटनेनंतर पिंपळी येथे जनावरांचे अवशेष सापडल्याने गोवंश हत्त्येचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत ग्रामस्थांनी बैठक घेऊन घटनेचा निषेधही केला होता. तर पोलिसांनी याप्रकरणानंतर गुहागर, चिपळूण मार्गावर बंदोबस्त वाढवला होता. तसेच गस्तीतही वाढ करून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती.
मुंबई - गोवा महामार्गावरील सावर्डे हद्दीतील वहाळ फाटा येथे जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो सावर्डे पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतला आहे. खेड ते कराडच्या दिशेने ही जनावरे घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.