चिपळूणच्या पाचाड, शिरगाव, धामनंद उपकेंद्रात एक दिवस-एक उपकेंद्र मोहिम
By मेहरून नाकाडे | Published: December 13, 2023 04:55 PM2023-12-13T16:55:13+5:302023-12-13T16:56:05+5:30
चिपळूण ग्रामीण उपविभागाच्या ३३/११ केव्ही पाचाड, शिरगाव व धामनंद उपकेंद्रात 'एक दिवस-एक उपकेंद्र' ही मोहिम राबविण्यात आली.
रत्नागिरी : ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल-दुरूस्ती आवश्यक असते. ग्राहकसेवेसाठी उपकेंद्र सदैव सज्ज ठेवण्यासाठी चिपळूण विभागातील चिपळूण ग्रामीण उपविभागाच्या ३३/११ केव्ही पाचाड, शिरगाव व धामनंद उपकेंद्रात 'एक दिवस-एक उपकेंद्र' ही मोहिम राबविण्यात आली.
महावितरणची यंत्रणा खुल्या आसमंतात असल्याने वारे, वादळ, पाऊस एकूणच नैसर्गिक स्थित्यंतराचा फटका या यंत्रणेला बसतो. त्यामुळे यंत्रणा कोलमडते. विजपुरवठा सुरळित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लागते. त्याचप्रमाणे एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे सुध्दा विजपुरवठा ठप्प होत असतो. तांत्रीक बिघाड उद्भवू नयेत यासाठी देखभाल दुरूस्ती महत्वाची आहे. याच उद्देश्यातून चिपळूण ग्रामीण उपविभागाच्या ३३/११ केव्ही पाचाड, शिरगाव व धामनंद उपकेंद्रात 'एक दिवस-एक उपकेंद्र' ही मोहिम राबविण्यात आली.
यावेळी उपकेंद्र परिसरातील स्वच्छतेसह पॉवर ट्रान्सफॉर्मरची ऑईल पातळी तपासणी, आयसोलेटरचे ऑईलिंग व ग्रिसिंग, बॅटरी देखभाल, ११ फिडरचे जंप बदलणे, उपकेंद्र आर्थिंग सारखी तांत्रिक कामे करण्यात आली. कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर, सबंधित शाखा अभियंता यांच्या सुचनेनुसार जनमित्र, यंत्रचालक यांनी उपकेंद्रातील कामकाज पूर्ण करण्यात आले. महावितरणच्या चिपळूण विभागातील टीमने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल वीज ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.