भोवडेत नदीत वाहून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:20+5:302021-08-20T04:36:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथे नदीत वाहून गेल्याने पालघर येथील एकाचा मृत्यू झाला आहे, तर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथे नदीत वाहून गेल्याने पालघर येथील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दाभोळे सुकमवाडी येथे दोन गोठे कोसळून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देवरूख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी पावसाची संततधार सुरू होती. याचा फटका दाभोळे - सुकमवाडी येथील गोठ्यांना बसला आहे. येथील सुरेखा शिवराम सुकम व संतोष तानू सुकम यांच्या गोठ्याच्या भिंती पावसाने भिजून ढासळल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला आहे. दोन्ही गोठ्यांचे मिळून एक लाख रुपये नुकसान झाल्याची नोंद तहसील दफ्तरी करण्यात आली आहे. ऐन पावसाळ्यात सुकम यांचे गोठे जमीनदोस्त झाल्याने जनावरे बांधायची कोठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
तसेच संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथील विजय शंकर सावंत यांच्याकडे पालघर येथील गुरुनाथ कृष्णा कुराडे हे कामाला होते. मंगळवारी सकाळी ते आंघोळ करण्यासाठी नदीवर गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच विजय सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना गुरुनाथ कुराडे हे मृतावस्थेत सापडल्याची माहिती देवरूख तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.