बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:50 PM2020-10-07T14:50:02+5:302020-10-07T14:59:00+5:30
state transport, mumbai, bestservis, ratnagiridepot बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.
रत्नागिरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत सुरू असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी रत्नागिरी विभागातून शंभर गाड्या रवाना होणार आहे. याशिवाय दोनशे चालकवाहकांची जोडी मिळून ४०० कर्मचारी देखील रवाना होणार आहेत. सकाळ व संध्याकाळ सत्रातील फेऱ्यांसाठी चालक वाहकांच्या स्वतंत्र दोनशे जोड्या कार्यरत राहणार आहेत.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाने एप्रिलमध्ये मदत केली होती. त्यावेळी रत्नागिरी विभागातील एकूण ३२ जणांची टीम मुंबईला रवाना झाली होती. लॉकडाऊन कालावधीत डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय रुग्णालयातील इतर कर्मचाºयांची विशेष वाहतूक सुरू करण्यात आली होती.
सध्या एकूणच भारमानाअभावी एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम झाल्याने महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाने बेस्टच्या मदतीसाठी चालक वाहकांसह शंभर गाड्या मुंबईत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात या गाड्या घेऊन चालक वाहक मुंबईकडे रवाना होणार आहेत.
कोरोना संकटकाळातही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. आधीच तोट्यात असलेले महामंडळ आर्थिक संकटात सापडले. प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी भारमाना अभावी दररोजचा तोटा सोसावा लागत आहे. गेले तीन महिने महामंडळाचे कर्मचारी विना वेतन कार्यरत आहेत.
महामंडळाच्या सूचनेनुसार बेस्ट साठी शंभर गाड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. चारशे चालक व वाहकांनाही पाठविण्याची सूचना असल्याने कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात कर्मचारी गाड्या घेवून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
- अनिल मेहत्तर,
विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी