दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:57+5:302021-04-15T04:29:57+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे जंगलात एक बिबट्या मंगळवारी मृतावस्थेत सापडला. दोन बिबट्यांच्या झटापटीत नर जातीचा बिबट्या झाडावर ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे जंगलात एक बिबट्या मंगळवारी मृतावस्थेत सापडला. दोन बिबट्यांच्या झटापटीत नर जातीचा बिबट्या झाडावर चढला असावा आणि तेथून कोसळल्याने दुखापत होऊन तो मृत झाला असावा, असा अंदाज आहे. मानेला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील पिरंदवणे येथील गुराखी गुरे घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला असता त्याला तारवशेत या ठिकाणी बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसला. सुरुवातीला तो झोपला असल्याचे त्याला वाटले; परंतु बराच काळ त्या बिबट्याची कोणतीच हालचाल नसल्याने व तेथून दुर्गंधी येऊ लागल्याने हा बिबट्या मृत झाला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ही माहिती पोलीस पाटील अनिल भामटे यांना दिली. त्यांनी बिबट्या मृतावस्थेत असल्याची खात्री करून त्याची खबर वनविभागाला दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक एन. एच. गावडे, डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कांबळे, लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.
मृत बिबट्या कुजलेल्या स्थितीत होता. तो अडीच वर्षांचा असून, नर जातीचा होता. तो दोन दिवसांपूर्वी मृत झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
देवरुख येथील पशुधन अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. त्याच ठिकाणी मृत बिबट्याला अग्नी देण्यात आला. यावेळी वनविभागाचे अधिकारी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दुसऱ्या बिबट्याशी त्याची झटापट झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोन बिबट्यांची झुंज?
आजूबाजूच्या झाडांवर पाहिलेले ओरखडे पाहून येथे दोन बिबट्यांची झुंज झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात एक बिबट्या झाडावर चढला असावा आणि तेथून तो खाली पडला असावा, असाही निष्कर्ष काढण्यात येत आहे.