आवाशी येथील अपघातात एकजण ठार, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:16 PM2019-05-13T12:16:43+5:302019-05-13T12:17:27+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्यावर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटून तो ट्रकवर जाऊन आदळल्याने रविवारी सकाळी सव्वासहा वाजता घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर आहेत.
आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्यावर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटून तो ट्रकवर जाऊन आदळल्याने रविवारी सकाळी सव्वासहा वाजता घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर आहेत.
नवी मुंबई येथून देवगड, सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच०९/सीयू-५४२०)मधून संजय रघुनाथ कांबळे (५८), स्मिता संजय कांबळे (५०), सुचिता संजय कांबळे (२८), आर्यन संदेश कांबळे (०६), स्वप्निल कांबळे, दीपक जाधव व चालक मोहम्मद शहजाद (२७) प्रवास करीत होते. सकाळी सव्वासहा च्या दरम्यान चालकास झोप अनावर झाल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व समोरुन येणाऱ्या ट्रक (जीटी ०३/एएक्स५५९२)वर तो विरुध्द दिशेला जाऊन धडकला. हा ट्रक गोवा ते रोजकोट असा चालला होता.
ट्रक चालक बलदेवसिंग संतोष सिंग हा चिपळूण येथे विश्रांती घेऊन राजकोटच्या दिशेने चालला होता. या अपघातात संजय रघुनाथ कांबळे हे जागीच ठार झाले तर त्याचे उर्वरित कुटुंबिय जखमी झाले असून त्यांच्यावर खेड येथील उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार सुरू आहेत.
यापैकी बोलेरो चालक मोहम्मद शहजाद, स्वप्निल कांबळे व दीपक जाधव हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर चिपळूण येथील एसएमएस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.