Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:21 PM2022-05-03T19:21:49+5:302022-05-03T19:23:04+5:30
चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले.
खेड : चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना मुंबई- गोवा महामार्गावर मंगळवारी (दि. ३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमाराला खेड तालुक्यातील उधळे गावानजीक भारत पेट्रोल पंपासमोर घडली. रोशन हरी सरफरे (२८, रा. भू, ता. राजापूर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
या अपघातात महेश राजाराम पेंढारकर, (४२, रा. नांदगाव ता. चिपळूण), अक्षता अनंत मांडवकर (२४, रा. नालासोपारा, ठाणे), सरस्वती गंगाराम घाडी, (७०, रा. उभावाडा, लांजा) हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धेश सदानंद शेट्ये (३४, रा. वाकेड, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील आरामबस (एमएच ०४, जेके ९७७२) घेऊन विरार ते लांजा असा येत हाेता.
महामार्गावर उधळे गावानजीक ताे आली असता चालकाला झोप लागली आणि वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे आराम बस पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप (एमएच ०८, एपी ३२८१) गाडीला धडकली. या धडकेबराेबर महिंद्रा पिकअप समाेरच उभ्या असणाऱ्या रेडीमिक्स सिमेंट टँकर (एमएच ०४, जेके २७५३)वर आदळला तर टँकर इनोव्हा (एमएच ०६, एएन ८४४२) ला पाठीमागून धडकला.
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात टँकरच्या मागे उभी असलेली महिंद्रा पिकअप व आराम बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातात चालकाच्या केबिनमध्ये बसून प्रवास करणारा रोशन हरी सरफरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तत्काळ नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोशन सरफरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताची नाेंद खेड पाेलीस स्थानकात करण्यात आली आहे.