एक किलो मटारच्या पैशांत मिळते पावणे दोन लिटर पेट्रोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:16 PM2021-11-18T14:16:26+5:302021-11-18T14:21:21+5:30
मेहरुन नाकाडे रत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची ...
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ८० ते २०० रुपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू आहे. बाजारात मटारची आवक सुरू झाली असून, प्रमाण अल्प आहे. मात्र, दर गगनाला भिडले आहे. दोनशे रुपये किलो दराने मटार विक्री सुरू असून, एक किलो मटारच्या पैशात तब्बल पावणे दोन लिटर पेट्रोल येत आहे.
दिवाळीपूर्वीपासूनच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोच्या दरात काही अंशी घसरण झाली असून, ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबिरीचे दरही गडगडले असून २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.
नवा कांदा, बटाटा बाजारात आला असून कांदा ३५ ते ४५ रुपये, तर बटाटा ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर कडाडले असून १६० ते १८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भाज्यांचे दर वाढीव असल्याने किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे. भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडून लागले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पालेभाज्या बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे. मेथी, मूळा, पालक, माठ, मोहरीची भाजी विक्रीसाठी येत आहे. आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद होता, अणुस्कूरामार्गे वाहतूक सुरू असल्याने अंतरवाढीचा परिणाम दरावर झाला असल्याचे सांगण्यात येते.
पेट्रोल ११२, तर डिझेल १०५ रुपये लिटर
दिवाळीत इंधनाचे दर पाच ते दहा रुपयांनी कमी झाले असले, तरी गेल्या वर्षभर वाढत्या इंधन दराचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. ११७ रुपये लिटर दराने विक्री करण्यात येणारे पेट्रोल ११२ रुपये लिटर तर डिझेल ११५ ऐवजी १०५ रुपये दराने विक्री सुरू आहे.
कोरोनामुळे आधीच आर्थिक स्थिती कोलमडलेली असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ, पावसाचे कारण देण्यात येत असले, तरी भाजीपाला दरात कायमच उतार कमी, चढच अधिक आहे. - शमिका रामाणी, रत्नागिरी
भाज्यांचे दर आधीच कमी नव्हते त्यात पावसाचे व इंधन दरवाढीचे कारण देत पुन्हा भाववाढ करण्यात आली आहे. वास्तविक दरावर नियंत्रण नसल्याने शेतकरी, ग्राहक भरडला जात आहे. दरवाढीमुळे भाज्या खरेदी करताना प्रश्न पडतो. - स्वराली करंदीकर, रत्नागिरी
स्थानिक भाज्यांचे दर कडाडलेले..
- पालेभाज्यांची आवक सुरू असली, तरी १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.
- स्थानिक भाज्यांमध्ये कुयरी, वांगी विक्रीसाठी येत असले तरी दर मात्र कडाडलेलेच आहेत.
भाजीपाला दर
मटार २००
वांगी ४०
फरसबी ८०
घेवडा ६०
भेंडी ६०
कोबी ३०
फ्लाॅवर ६०
सिमला मिरची ४०
टोमॅटो ४०/५०
बटाटा ३०/३५
कांदा ३५/४५