धनादेश न वटल्याने कर्जदाराला दंडासह एक महिना साधी कारावासाची शिक्षा!
By संदीप बांद्रे | Published: May 18, 2024 11:48 PM2024-05-18T23:48:57+5:302024-05-18T23:49:04+5:30
सावर्डे येथील गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार
चिपळूण : कर्जफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने सावडे येथील गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्जदार महेंद्र काशिराम कुंभार याला येथील न्यायालयाने ५१ हजार ५८० रूपये दंड ठोठावून एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील सावर्डे येथील गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून महेंद्र कुंभार याने १ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जफेडीपोटी त्याने पतसंस्थेच्या नावाने ३१ हजार रूपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश न वटल्याने त्याच्याविरोधात पतसंस्थेने न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या १३८ कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला होता. या फौजदारी गुन्ह्याच्या कामी महेंद्र कुंभार याला शिक्षा करणेत आलेली आहे.
चिपळूणचे मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर. काळे यांनी त्याला ५१ हजार ५८० रूपये दंड ठोठावून त्यापैकी ५१ हजार ५८० रूपये नुकसान भरपाई म्हणून गुरुकृपा पतसंस्थेला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न दिल्यास १५ दिवस जादा साधी कारावासाची शिक्षा सुनावणेत आलेली आहे.