चिपळुणातील वाचनालयांसाठी एक हजार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:32 AM2021-08-26T04:32:59+5:302021-08-26T04:32:59+5:30
चिपळूण : महापुरात चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला पुराचा तडाखा बसला. अनेक पुस्तकांचे ...
चिपळूण : महापुरात चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला पुराचा तडाखा बसला. अनेक पुस्तकांचे यामध्ये नुकसान झाले. या आपत्तीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना, संचालक मंडळाने ग्रंथ साहाय्य करण्याचे आवाहन समाजापुढे केले आणि अनेक ठिकाणांहून ग्रंथसंपदा मिळू लागली आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची एक हजारांहून अधिक ग्रंथसंपदा या दोन्ही वाचनालयांना भेट दिली आहे.
स्वातंत्र्य दिनी आयुक्तांचा कृष्णप्रकाश यांचा वाढदिवस असतो. मात्र, या वर्षी वाढदिवस साजरा न करता चिपळूणच्या वाचनालयाला असंख्य नवे कोरे ग्रंथ दिले आणि तेही नामवंत प्रकाशन संस्थांचे आहेत. सोमवार पोलीस आयुक्तालयात कृष्णप्रकाश यांच्या दालनात झालेल्या समारंभात त्यांनी हे सर्व ग्रंथ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला भेट दिले.
यावेळी कृष्णप्रकाश म्हणाले की, ‘मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. मित्रांच्या घरी आणि सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन मी पुस्तके वाचत असे. पुस्तके वाचूनच मी घडलो. ज्ञानासाठी पुस्तकाशिवाय पर्याय नाही. चित्रवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रात चिपळूण येथील वाचनालयाच्या झालेल्या नुकसानाची बातमी वाचली आणि या वाचनालयांना मदतीचा हात द्यायचा, हे निश्चित केले. आज मला आनंद वाटतो, मी थोडे तरी सहकार्य करू शकलो.’
ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक डोंगरे, आसावरी जोशी व आदित्य जोशी उपस्थित होते.