गणपतीपुळेत ‘एक गाव एक गणपती’; ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात ग्रामस्थांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 02:12 PM2023-09-19T14:12:06+5:302023-09-19T14:12:36+5:30
गणेश चतुर्थीला परिसरातील ग्रामस्थांना स्पर्श दर्शन दिले जाते
संजय रामाणी
गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) गावात घराेघरी गणेशाची मूर्ती न आणण्याची प्रथा आहे. भाद्रपदी गणेशाेत्सवाला ‘श्रीं’च्या चरणाला स्पर्श करून ग्रामस्थ त्याची मनाेभावे पूजा करतात. गेली अनेक वर्षे ही प्रथा सुरू असून, आजही ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा जपली जात आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामध्ये गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, निवेंडी, भगवतीनगर, भंडारपुळे, वरवडे आधी ठिकाणी घरोघरी गणपतीची मूर्ती आणण्याची प्रथा नाही. या ठिकाणी असणाऱ्या स्वयंभू ‘श्रीं’च्या मंदिरात गणेश चतुर्थी दिवशी पहाटे उठून सर्व ग्रामस्थ साध्या धूत वस्त्रामध्ये दर्शन घेतात. तेथील फुलार व तीर्थ घरी नेऊन त्याची विधिवत पूजा केली जाते. गावात ‘एक गाव, एक गणपती’ अशी प्रथा जपली जात असल्याने सायंकाळी गणपतीपुळेतील ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीला परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
ग्रामस्थांना स्पर्श दर्शन
इतरवेळी गणपतीपुळेतील ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात ग्रामस्थांना प्रवेश नसताे. मात्र, ‘एक गाव एक गणपती’ प्रथेमुळे गणेश चतुर्थीला परिसरातील ग्रामस्थांना स्पर्श दर्शन दिले जाते. त्यासाठी पहाटे ५ वाजता स्पर्श दर्शन सुरू हाेणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्श दर्शनाचा याेग साधता येणार आहे. त्यानंतर आरती झाल्यावर स्पर्श दर्शन बंद केले जाते.