राजापुरात अर्जुनाच्या पुरात एकजण गेला वाहून, पुन्हा पूरसदृश्य स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:44 AM2021-07-19T11:44:19+5:302021-07-19T11:46:42+5:30
Flood Rajapur Ratnagiri : पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. दरम्यान, तालुक्यातील रायपाटण - गांगणवाडी येथून एक वृद्ध अर्जुना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. विजय शंकर पाटणे (७०, रा. खेड) असे त्यांचे नाव आहे.
राजापूर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून, पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे.
दरम्यान, तालुक्यातील रायपाटण - गांगणवाडी येथून एक वृद्ध अर्जुना नदी पात्रात वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने घडली. विजय शंकर पाटणे (७०, रा. खेड) असे त्यांचे नाव आहे.
तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेमुळे नगर परिषदेने धोक्याच्या सूचना देणारा सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धाऊलवल्ली-आंबेलकरवाडी हा मुख्य रस्ता खचला आहे. तर कुवेशी येथे वहाळ फुटुन वहाळाचे पाणी रवि राजापकर यांच्या घरात घुसून नुकसान झाले आहे. नाटे ठाकरेवाडी येथे वहळावरून पाणी गेल्याने ठाकरेवाडीचा संपर्क तुटला आहे. तर शीळ -चिखलगाव मार्गावर पुन्हा एकदा पुराचे पाणी आल्याने हा मार्ग बंद पडला आहे.
शहरातील चिंचबांध रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्गही बंद झाला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेकडे येऊ लागल्याने जवाहर चौकाकडे येणारी एस. टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर शहरातील शिवाजी पथ मार्गावर पाणी आल्याने नगर परिषदेने सुरक्षा बोट तैनात ठेवली आहे.
दरम्यान, खेड येथून रायपाटण - गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आलेले विजय शंकर पाटणे सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अर्जुना नदीकिनारी गेले होते. मात्र, नदीचे पाणी वेगाने वाढल्याने पुराच्या पाण्यात विजय पाटणे वाहून गेल्याचे माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली. याबाबत राजापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. याबाबत ग्पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.