चाकरमान्यांसाठी खुशखबर!, कशेडी घाटातील कोकणात येण्यासाठीचा मार्ग खुला
By मनोज मुळ्ये | Published: February 24, 2024 04:28 PM2024-02-24T16:28:40+5:302024-02-24T16:34:37+5:30
कशेडी घाटातील ताण कमी होणार
रत्नागिरी / खेड : शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकतात. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.
आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ जिल्ह्यातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा उत्साहात साजरा होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावरील गर्दी वाढते. आता एक बोगदा खुला झाल्याने कशेडी घाटातील ताण कमी होणार आहे.