वाशिष्ठी पुलावरून एकेरी वाहतुकीचा १५ जूनचा मुहूर्तही हुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:06+5:302021-05-21T04:33:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत शहरातील वाशिष्ठी नदीवरील बहादूर शेखनाका पुलावरून एकेरी वाहतुकीसाठी अखेरचा १५ जूनचा मुहूर्त काढला आहे. मात्र, अजूनही पुलाचा स्लॅब, गर्डरजोडणी, दोन्ही बाजूंनी जोडरस्त्याचे काम बाकी असल्याने हाही मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी बहादूर शेखनाका पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, ईगल कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.आर. मराठे, कर्मचारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या पुलावरून कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होईल, असे स्पष्ट केले होते.
मुळात येथील जुना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. या नवीन पुलाच्या ५६ गर्डरपैकी ४९ गर्डर पिलरवर चढविण्याचे काम याआधीच पूर्ण झाले होते. त्यानंतर आता उर्वरित गर्डरही चढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गर्डर चढविण्यासाठी आणलेली यंत्रणा गुरुवारी पाठवून देण्यात आली. आता या पुलाच्या जोडरस्त्यासाठी भरावाचे काम सुरू केले आहे. हे जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच तातडीने पुलावरील स्लॅब व संरक्षक कठडा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तूर्तास १५ जूनचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------------------------
वाशिष्ठी नदीवरील पुलाचे गर्डर चढविण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आता कामाला वेग येऊ शकतो. मात्र, मध्यंतरी काही कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने कामगारसंख्या घटली आहे. त्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही १५ जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- आर.आर. मराठे, प्रभारी उपअभियंता, महामार्ग विभाग
---------------------------
बहादूर शेखनाका येथील वाशिष्ठी पूल अजून किमान तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकत नाही. पुलावरील गर्डर जोडणे, स्लॅब टाकणे, जोडरस्ता उभारणे, संरक्षक कठडा आदी कामे बाकी आहेत. हे काम १५ जूनपर्यंत होणे अशक्य आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ते काम त्वरित मार्गी लागणे शक्य नाही. महामार्ग विभागाने पावसाळा लक्षात घेत आवश्यक असलेल्या उपाययोजनांची तयारी आतापासूनच करायला हवी.
- शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती, चिपळूण
-----------------------
मुंबई-गोवा महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता कळंबस्तेच्या बाजूने जोडरस्ता उभारण्याचे काम सुरू आहे. (छाया : संदीप बांद्रे)