चिपळूण वाशिष्ठी पुलावरून १५ जूनपूर्वी होणार एकेरी वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:29+5:302021-04-17T04:31:29+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचे एकूण ३२ गर्डर ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचे एकूण ३२ गर्डर चढविण्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. १५ जूनपूर्वी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी ठेकेदार आणि प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी खुला होणार हे आता निश्चित झाले आहे.
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल जीर्ण होऊन धोकादायक बनले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्यामुळे हे दोन्ही पुलांवरील वाहतूक बंद करण्याची मागणी सातत्याने होत असतानाच बाजूलाच उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणीही केली जात होती. प्रत्यक्षात तीन वर्षांपूर्वी नवीन पुलांच्या कामाला सुरुवात झाली होती, परंतु आधीच्या ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून दिले. त्यामुळे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडेच हे काम देण्यात आले.
काम जलद गतीने व्हावे यासाठी माजी सभापती शौकत मुकादम हे स्थानिक पातळीवर सतत पाठपुरावा करत होते. खासदार विनायक राऊत यांनीही या कामासाठी केंद्रीय पातळीपासून ते स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता.
गेले काही महिने पुलाचे काम दिवसरात्र सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुलाचे पिलर आणि जोडरस्त्यांचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वाकडे गेले आणि पिलरवर गर्डर चढवण्याचे अंतिम काम शिल्लक राहिले होते.
शुक्रवारी त्यासाठी सर्व अत्यावश्यक यंत्रसामुग्री दाखल झाली असून, सुमारे ४०० टन क्षमतेचे तीन अत्याधुनिक क्रेन दाखल झाले आहेत. गर्डर चढविण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. पुलाला एकूण ३२ गर्डर असून, ते येत्या १५ दिवसांत पिलरवर चढवून पूर्ण होणार आहेत. त्यानंतर जोडरस्ता आणि अन्य कामे पूर्ण करून १५ जूनपूर्वी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे.
...................................
फोटो -
चिपळूण बहादूरशेख पुलावर गर्डर चढविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याआधीची तयारी पूर्ण झाली आहे.