एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:55+5:302021-05-18T04:32:55+5:30

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० ...

In one year, diesel grew by 30 per cent and groceries by 40 per cent | एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला

एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला

Next

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढ सातत्याने सुरू आहे. वर्षभरात डिझेलच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरात वाढ झाली की, वाहतूक भाडे वाढते. रत्नागिरीत जीवनावश्यक वस्तू वाशी (मुंबई), कोल्हापूर येथून येतात. साहजिकच वाहतूक भाड्यामध्ये किलोमागे ३० पैशांची वाढ होते. खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे.

तांदूळ, बेसनाच्या दरातही वाढ झाली असली तरी गूळ व साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. खाद्यतेल मलेशियातून भारतात आयात होत आहे. कच्चा माल भारतातून निर्यात केला जात असला तरी रिफाईंड तेल मात्र भारतात आल्यानंतरच त्याचे पॅकिंग केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरवाढीचा फटका किरकोळ, घाऊक विक्रीवर झाला आहे. दिवाळीपासून तर खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड बदल झाला आहे. दरवाढीमुळे दैनंदिन बजेट कोलमडले आहे.

डाळी, कडधान्य व तांदूळाच्या किमतीतही वाढ झाली आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या वेतनात गेल्या दोन वर्षात वाढ झाली नाही. परिणामी मिळणाऱ्या मोजक्या पैशातच उदरनिर्वाह व अन्य खर्च भागावावे लागत असल्याने डाळभातही महागला आहे.

लाॅकडाऊनचे परिणाम सोसत असतानाच महागाईचा सामनाही करावा लागत आहे. उत्पन्न जेमतेम तेच आहे. मात्र, महागाईमुळे खर्चात वाढ झाली आहे. दैनंदिन खर्च भागविणे अवघड बनले आहे. महागाईवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

- शमिका रामाणी, गृहिणी.

दीपावलीपासून बाजारातील खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. अशाचप्रकारे तेलाच्या किमतीतील वाढ जर सुरूच राहिली तर भविष्यात तेलाची फोडणी न देता पाण्याची द्यावी लागणार आहे. दरवाढ करताना सर्वसामान्यांचा विचार करणे गरजेचे आहे.

- सायली पवार, गृहिणी.

कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. दोन वर्षांत तर महागाईने कहर केला आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण राहिलेले नसल्यामुळेच डाळी, खाद्यतेल, कडधान्यांच्या दरात वाढ सुरूच आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात उसळ किंवा डाळपैकी एकच करावे लागत आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे डाळभातालाही महागाईची झळ बसली आहे.

- दीपश्री पाटील, गृहिणी.

Web Title: In one year, diesel grew by 30 per cent and groceries by 40 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.