ओणी - अणुस्कुरा मार्गावर वाढलेली झाडी वाहतुकीला अडथळ्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:14+5:302021-08-20T04:35:14+5:30
राजापूर : गेल्या काही दिवसांपासून ओणी - अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, चालू पावसाळ्यात या मार्गावर अनेक ...
राजापूर : गेल्या काही दिवसांपासून ओणी - अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, चालू पावसाळ्यात या मार्गावर अनेक ठिकाणी झाडी वाढल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. मुसळधार पाऊस आणि वाढलेली वाहतूक यामुळे आधीच खड्डेमय झालेल्या रस्त्यालगत वाढलेल्या झाडीचा वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये अतोनात नुकसान झाले होते. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात भूस्खलन होऊन तो घाट रस्ता बंद पडला. त्यामुळे अणुस्कुरा मार्गावरील वाहतूक वाढली आहे. कोकणात येणारी मालवाहतूक, प्रवासी वाहतुकीचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, देवरुख, गुहागर, लांजा यासह राजापूर आगारातील काही बसेस अणुस्कुरामार्गे दैनंदिन ये - जा करतात. शिवाय सर्वप्रकारची लहान-मोठी खासगी वाहनेही याच मार्गाचा वापर करत आहेत.
कोकण व कोल्हापूरला जोडणारा व अंतराच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल, असा हा मार्ग असल्याने मागील काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यातच आंबा घाट बंद असल्याने अणुस्कुरा मार्गावरील वाहतुकीत जास्तच वाढ झाली आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश आहे. वाहतूक वाढल्याने खड्डे पडून या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहने चालविणे जिकरीचे ठरत असतानाच या मार्गावर दुतर्फा प्रचंड झाडी वाढल्याने समोरुन भरधाव वेगाने आलेल्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यातूनच अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्यांचा विचार करता बांधकाम विभागाने तत्काळ ओणी - अणुस्कुरा मार्गावर वाढलेली झाडी हटवावी, अशी मागणी प्रवासी, वाहतूकदार करत आहेत.