‘कीर्तनसंध्या’तर्फे गुढीपाडव्यापासून ऑनलाईन कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:12+5:302021-04-04T04:33:12+5:30
रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे यावर्षीचा दशकपूर्ती कीर्तन महोत्सव ऑनलाईन सादर करण्यात आला होता. त्याला मिळालेल्या ...
रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या परिवारातर्फे यावर्षीचा दशकपूर्ती कीर्तन महोत्सव ऑनलाईन सादर करण्यात आला होता. त्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर लवकरच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९४७ नंतरच्या भारतीय युद्धाची चित्तथरारक कथा असलेली कीर्तने ऑनलाईन पाहायला मिळणार आहेत.
कीर्तनसंध्या महोत्सवाने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आगळे महत्त्व निर्माण केले आहे. सलग नऊ वर्षे कीर्तनमहोत्सवास चांगला प्रतिसाद लाभत आहे. यावर्षी कोरोनामुळे कीर्तन महोत्सव ऑनलाईन आयोजित केला होता. ऑनलाईन कार्यक्रमाचा दोन लाख रसिकांनी लाभ घेतला.
या कीर्तनांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९७१ पर्यंत झालेल्या युद्धांचे वर्णन आणि त्यात मर्दुमकी गाजवलेल्या योद्धयांची गाथा मांडण्यात आली आहे. गतवर्षी प्रत्यक्ष सादर झालेली योद्धा भारत नावाची ही कीर्तनमालिका ऑनलाईन प्रसारित केली जाणार आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवांच्या वाणीतून १९४७ नंतरच्या भारतीय युद्धांची कहाणी रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. सर्व कीर्तनांच्या पूर्वरंगात रामायण आणि उत्तररंगात १९४७-१९७१ कालावधीतील युद्धाच्या रोमांचक कथा सादर करण्यात आल्या आहेत. त्यातील पहिले कीर्तन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. मालिकेतील पुढची कीर्तने दि. १७ एप्रिल, दि.२४ एप्रिल, दि.१ मे आणि दि.८ मे रोजी सादर केली जाणार आहेत.