‘कॅशआॅन डिलिव्हरी’ला आॅनलाईन पेमेंटचा पर्याय
By admin | Published: November 16, 2016 10:38 PM2016-11-16T22:38:10+5:302016-11-16T22:38:10+5:30
नोटा बंदचा परिणाम : ‘स्वॅप मशीन’चा वापर अद्याप नाही
अरूण आडिवरेकर -- रत्नागिरी -चलनातील ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांवर शासनाने आणलेल्या बंदीचा कुरिअर सेवेला फटका बसला आहे. ‘कॅशआॅन डिलिव्हरी’चा माल पैशांअभावी परत जात असल्याने कुरिअर कार्यालयात ठेवण्यात येत आहे. ग्राहकाकडे सुटे पैसे उपलब्ध होत नसल्याने हा माल परत पाठवला जात आहे. त्यामुळे कुरिअर सेवा देणाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी आता ‘कॅशआॅन डिलिव्हरी’चा पर्याय निवडून आॅनलाईन पेमेंट केल्यानंतरच वस्तू पाठवली जात आहे.
आॅनलाईन खरेदी करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, विविध प्रकारच्या वस्तू स्वस्तात आणि घरबसल्या मिळत असल्याने आॅनलाईन खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मोबाईल, कपडे, घड्याळ, बॅग यांसारख्या वस्तूंबरोबरच घरगुती वापराच्या वस्तू आॅनलाईन खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. मात्र, केंद्र शासनाने चलनातील ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद केल्याने ग्राहकांकडे वस्तूचे पैसे देण्यासाठी आवश्यक रक्कम नसल्याचे दिसत आहे. आॅनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडे गेल्यानंतर ५०० व १०००च्या नोटाच असल्याने कुरिअर बॉईज वस्तू घेऊन परत येत आहेत.
कुरिअर सेवा देणाऱ्या कार्यालयांनी या नोटा स्वीकारणे बंद केल्याने ग्राहकांच्या वस्तू परत कार्यालयात जमा केल्या जात आहेत. त्यामुळे कोट्यवधीचा माल कुरिअरच्या कार्यालयात पडून आहे. या वस्तूंमध्ये मोबाईलचे प्रमाण अधिक आहे. ग्राहकांना या वस्तू परत देण्यासाठी मुदत देण्यात येत असून, त्या मुदतीत वस्तू न नेल्यास त्या पुन्हा कंपनीकडे पाठवून दिली जात आहेत. या साऱ्या प्रकारात कुरिअर सेवा देणाऱ्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याला पर्याय म्हणून आता आॅनलाईन कंपन्यांनी आॅनलाईन पेमेंट करूनच वस्तू देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ‘कॅशआॅन डिलिव्हरी’ऐवजी आॅनलाईन पेमेंट केल्यावरच वस्तू पाठविल्या जात आहेत. हे पेमेंट भरल्यानंतर कुरिअर सेवा देणाऱ्या कंपन्यांना संदेश पाठवून कल्पना दिली जात आहे.
स्वॅप मशीन नाहीच
कुरिअर सेवा देताना स्वॅपिंग मशीनद्वारे वस्तूचे पैसे घेण्यास काही ठिकाणी सुरूवात झाली आहे. मात्र, रत्नागिरीत अजूनही असा पर्याय ठेवण्यात आलेला नसल्याचे कुरिअर सेवा देणाऱ्या कंपन्यांनी सांगितले. आॅनलाईन पेमेंट करूनच वस्तू येत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.
ग्राहकांना फोन नाही
कुरिअर सेवा देणाऱ्या कार्यालयात वस्तू आल्यानंतर एकदाच फोन करून ग्राहकाला कल्पना दिली जात आहे. सध्या नोटा बंदमुळे वस्तू परत येत आहेत. पण, त्यानंतर पुन्हा कार्यालयातून ग्राहकांना फोन केला जात नसल्याने ग्राहकांची अडचण होत आहे.