ऑनलाईन योग प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:02+5:302021-04-27T04:32:02+5:30
रत्नागिरी : येथील पतंजली महिला योग समितीतर्फे ऑनलाईन योग प्रशिक्षण सुरू झाले आहे. पहाटे ५ ते साडेसहा तसेच ...
रत्नागिरी : येथील पतंजली महिला योग समितीतर्फे ऑनलाईन योग प्रशिक्षण सुरू झाले आहे. पहाटे ५ ते साडेसहा तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात योग, प्राणायाम, आसने, सूर्यनमस्कार, मुद्रा तसेच कोरोनाविषयक उपचार पद्धती आदींवर मार्गदर्शन केले जात आहे.
डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे
खेड : तालुक्यातील चोरवणे -जखमीचीवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे. अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम २०१९ ते २०२० मध्ये मंजूर झाले. मात्र या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्राम कृती दल सक्रिय
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ग्राम कृती दलांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ग्राम कृती दलाचे सदस्य गावांमध्ये येणाऱ्या नवीन लोकांची माहिती घेत आहेत. तसेच कोणी आजारी आहे का? याचीही चौकशी करीत आहेत.
मे महिन्यात संसर्गाचा धोका
राजापूर : मे महिन्याच्या अनुषंगाने आता मुंबईकर गावाकडे परतण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. सध्या मुंबईतही कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईकर आपल्या मूळ गावी परतण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे या मे महिन्यातही पुन्हा कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.
धुळीचा त्रास
देवरुख : सध्या देवरुख, पांगरी मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ पसरली आहे. या धुळीचा त्रास वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. धूळ खाली बसण्यासाठी या मार्गावर पाणी मारले जात आहे. तरीही धूळ मोठ्या प्रमाणावर उधळत असल्याने वाहन चालकांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
वीजवाहिन्या बदलण्याची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील खतीब मोहल्ला आणि गुंबद मोहल्ला या भागातील जुनाट वीजवाहिन्या वर्षानुवर्षे बदलण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वीही ग्रामस्थांनी सातत्याने या धोकादायक वीजवाहिन्या बदलण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
व्यावसायिकांचे नुकसान
दापोली : पंधरा एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. किराणा, भाजीपाला वगळता अन्य छोटे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांचे उत्पन्न गेले १५ दिवस थांबले आहे. लॉकडाऊन अजूनही वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
पुलासाठी निधी मंजूर
देवरुख : देवरुख - मार्लेश्वर मार्गालगत असलेल्या निवधे गावातील पुलासाठी ४ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गावर बाव नदीचे मोठे पात्र आहे. त्यामुळे या पुलाची उभारणी होणे गरजेचे आहे. या मार्गावर असलेला लोखंडी साकव धोकादायक बनला आहे.
ओसाड जागेत वृक्षलागवड
गुहागर : हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जंगलनिर्मिती हा उत्तम पर्याय आहे. यादृष्टीने ओस पडलेल्या जागांवर ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा उपक्रम साथ - साथ चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतला आहे. २५ वर्षांनंतर करार रद्द करून ही जागा झाडांसह मालकाच्या हाती देण्यात येणार आहे.
श्रमदानाने खड्डे बुजविले
राजापूर : तालुक्यातील नाटे, धाऊलवल्ली, जैतापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्रासदायक स्थितीत ये-जा करावी लागत होती. अखेर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या स्वयंसेवकांनी हे खड्डे श्रमदानाने बुजविले आहेत.
पगार रखडले
रत्नागिरी : अजूनही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे कर्मचारी सलग कोरोनाचा लढत आहेत. मात्र या कोरोना योध्द्यांचेच वेतन रखडले असून किमान आता तरी हे वेतन दिले जावे, अशी मागणी होत आहे.
अवकाळी पावसाचा अंदाज
रत्नागिरी : एकीकडे उष्णता वाढू लागली असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टी आणि गोव्यासह कोकणात पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मंगळवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हापूस महागला
चिपळूण : फळांचा राजा असलेला हापूस अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शहरातील बाजारपेठेत हापूस दाखल झाला असला तरी, ९०० ते १००० रुपये दराने चांगल्या प्रतीचा आंबा विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी हापूसकडे पाठ फिरवली आहे.
पावसाळ्यापूर्वीची कामे
देवरुख : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या संगमेश्वर बसस्थानकातून रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी कमी असल्याने आता येथील बसस्थानकातील कामे पावसाळ्यापूर्वी उरकण्यासाठी बसस्थानक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
रत्नागिरी : समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विविध स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज आता समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.