रत्नागिरी विभागांतर्गत दिवसाला अवघ्या ५५ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:17+5:302021-06-06T04:24:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत मोजक्या फेऱ्या सुरू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला असताना दिवसभरात अवघ्या ५५ फेऱ्या सोडण्यात येत आहेत.
कोरोनामुळे गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन झाले, त्यावेळी सलग दोन ते अडीच महिने एस.टी. सेवा बंद होती; मात्र शासनाच्या परवानगीनुसार टप्प्याटप्प्याने एस.टी सेवा सुरू करण्यात आली. ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने एस़ टी़ बसेस धावू लागल्या. त्यानंतर रत्नागिरी विभागातून एकूण ६०० बसेसद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांमधून दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती, त्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते; मात्र कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने १५ एप्रिलपासून पुन्हा संचारबंदी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन मात्र तद्नंतर लॉकडाऊनच घोषित करण्यात आले. यावर्षी अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभत नसला तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाहतूक मात्र करण्यात येत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कडक संचारबंदी काळात २ जूनपर्यंत १४० गाड्यांव्दारे ५२० फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे दिवसाला १६ हजार प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याने सहा ते साडेसहा लाखाचे उत्पन्न प्राप्त होत होते; मात्र जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन आठ दिवसांचे घोषित केले आहे. खासगी आस्थापना बंद आहेत. बँका, पतसंस्था दुपारपर्यंत सुरू असल्या तरी प्रवासी वाहतुकीवर मात्र चांगलाच परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी़ सेवा सुरू राहणार असून, २० गाड्यांद्वारे जेमतेम ५५ फेऱ्या सुरू असून, ११० किलोमीटर प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दैनंदिन ६५ ते ६६ हजार रुपयांचे उत्पन्न लाभत आहे. परिणामी, सद्यस्थितीत ४८ ते ४९ लाखांचा तोटा सोसावा लागत आहे.