रत्नागिरीत तीन वर्षांपासून एकच शिक्षणाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:43+5:302021-08-01T04:29:43+5:30
उपशिक्षणाधिकारी सर्व पदे रिक्त सागर पाटील / टेंभ्ये : राज्यामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत अव्वल येणारा जिल्हा म्हणून ओळख ...
उपशिक्षणाधिकारी सर्व पदे रिक्त
सागर पाटील / टेंभ्ये : राज्यामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत अव्वल येणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात गेली तीन वर्षे एकच शिक्षणाधिकारी कार्यरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात एकही उपशिक्षणाधिकारी कार्यरत नाही. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील ११ शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या; पण एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यासाठी करण्यात आलेली नाही. यामुळे रत्नागिरी जिल्हा यावर्षीही उपेक्षित राहणार का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) वर्ग १ ची तीन पदे मंजूर असतात. यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी निरंतर या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. शिक्षणाधिकारी पदाची कामे लक्षात घेता किमान प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र शिक्षणाधिकारी असणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली तीन वर्षे एकच शिक्षणाधिकारी तिन्ही पदांचा कार्यभार सांभाळत आहे. वास्तविक शैक्षणिकदृष्ट्या अव्वल असणाऱ्या जिल्ह्याकडे शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीच्या अन्य बदल्यांमध्ये जिल्ह्याला किमान एक नवीन शिक्षणाधिकारी मिळावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातून केली जात आहे.
-------------------
उपशिक्षणाधिकारी रिक्तच
प्रत्येक जिल्ह्यासाठी शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी वर्ग २ची सहा पदे मंजूर असतात. सध्या जिल्ह्यामध्ये एकही उपशिक्षणाधिकारी कार्यरत नाही. यावर्षीच्या उपशिक्षणाधिकारी बदलीमध्ये किमान चार पदे भरली जातील, अशी अपेक्षा केली जात आहे.
------------------------
केवळ एक गटशिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) वर्ग २ गट शिक्षणाधिकारी पद मंजूर असते. सध्या जिल्ह्यामध्ये ९ पैकी केवळ एक गट शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत.