Ratnagiri news: हायटेक चिपळूण बसस्थानकासाठी फक्त चार कामगार, गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:46 PM2023-03-18T18:46:59+5:302023-03-18T18:47:24+5:30
काम सुरू होऊन सहा वर्षे उलटली, तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही
चिपळूण : गेल्या सहा वर्षांपासून येथील हायटेक एसटी बसस्थानकाची प्रतीक्षा अनेकांना लागून राहिली आहे. नवीन ठेकेदाराची नेमणूक केल्यानंतर या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु येथे केवळ चार कामगारच काम करत आहेत. अत्यंत रेंगाळत हे काम सुरू आहे. दरवेळी कॉलम मधील पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र त्यापुढे हे काम सरकायला तयार नाही.
जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तिन्ही बसस्थानकांचे काम एकाच वेळी २०१७ मध्ये सुरू केले होते. यामध्ये रत्नागिरी बसस्थानकाचा प्रकल्प सर्वाधिक मोठा आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी, चिपळूणसाठी ३ कोटी ८० लाख, तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांचे काम तितक्याच तत्परतेने हाती घेण्यात आले होते.
चिपळूण बसस्थानकाच्या कामाचा ठेका स्कायलार्प, रत्नागिरीचा ठेका श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शन आणि लांजा बसस्थानकाचा ठेका एस. व्ही. एंटरप्राइजेस या कंपन्यांना देण्यात आला. या कामासाठी श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शनला ३६ महिन्यांची, तर स्कायलार्प व एस. व्ही. एंटरप्राइजेसला प्रत्येकी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र हे काम सुरू होऊन सहा वर्षे उलटली, तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. काही प्रमाणात झालेल्या कामातील लोखंड ही आता गंजून गेले आहे. गेल्या ५ वर्षात याविषयी अनेकांनी निवेदन व आंदोलने केली आहेत. परंतु या प्रकल्पांना आजतागायत गती मिळालेली नाही.
प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचेही हाल होत असल्याने ॲड. आवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणीही झाली. मात्र शासनाकडून अजूनही बसस्थानकाच्या कामाबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आगारात उभे राहण्यासाठी शेडची ही व्यवस्था नसल्याने उन्हाळा, पावसाळयात प्रवाशांना बाहेरच उभे राहावे लागत आहे.
काम संथपणे सुरू
काही महिन्यांपूर्वी सातारा येथील ठेकेदारास चिपळूणच्या बसस्थानकाचे काम मिळाले. सुरुवात दमदार झाली. मात्र नंतर महिनाभर बंद काम बंद होते. गेल्या आठवड्यापासून पुन्हा काम सुरु झाले. मात्र त्याला गती नाही.