पेयजल योजनेतून एकच वाडी वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:42+5:302021-03-26T04:30:42+5:30
राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना तसेच घरोघरी नळ ...
राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना तसेच घरोघरी नळ देण्याच्या योजनेतूनही कुवळेकरवाडीला वगळण्यात आले आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या कारभारामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, याची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुवळेकरवाडीतील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असताना अचानक सरपंच व ग्रामसेवक यांनी कुवळेकरवाडीला या योजनेतून वगळले आहे. गेली दोन वर्षे या योजनेचे काम सुरु असून, या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत नाही. या योजनेचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. योजनेसाठी पाईपलाईन टाकताना संबंधित जमीन मालकांची संमतीपत्रे घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे भविष्यात या योजनेत अडचणी येऊन योजना बंद पडण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून, ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. ही योजना संपूर्ण गावासाठी असल्याने प्रत्येक वाडीला पाणी मिळाल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे या योजनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
घरोघरी नळजोडणी देण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्येही कुवळेकरवाडीला वगळण्यात आले आहे. सरपंच व ग्रामसेवकांच्या या कारभारामुळे कुवळेकरवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांच्या कारभाराची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर उपरसपंच यशवंत कुवळेकर, ग्रामपंचायत सदस्य दक्षता कुवळेकर, माजी सदस्य मुकेश कुवळेकर यांच्यासह ३५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.