वैज्ञानिक दृष्टीकोनच फसव्या विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:26+5:302021-05-20T04:34:26+5:30

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम ...

Only scientific approach will get rid of the shackles of deceptive science: Hamid Dabholkar | वैज्ञानिक दृष्टीकोनच फसव्या विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल : हमीद दाभोलकर

वैज्ञानिक दृष्टीकोनच फसव्या विज्ञानाच्या विळख्यातून सुटका करेल : हमीद दाभोलकर

Next

रत्नागिरी : मानवी मनात खोलवर दडलेली मरणाची भीती ही जशी अंधश्रद्धा बळावण्याच्या मागे प्रमुख कारण आहे तसेच ते छदम विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि सध्याच्या कोविडच्या महामारी काळात ही भीती प्रत्येकाच्या मनात आज ठाण मांडून बसलेली असल्याने आज फसव्या विज्ञानाच्या दाव्यांना लोक मोठ्या प्रमाणावर बळी पडताना दिसत आहेत, असे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आयोजित केलेल्या छदमविज्ञानविरोधी जनजागरण मोहिमेतील ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या व्याख्यानात डॉ. हमीद दाभोलकर यांनी 'फसव्या विज्ञानाला लोक का भुलतात?, या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या स्वत:च्या क्षमतेने जे काही आपल्याला मिळू शकते, त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आसक्ती, आपली मुले नेहमीच सर्वांपुढे राहावी, ही पालकांची अति महत्त्वाकांक्षा हे मानवी मनाचे गुणधर्मही छदम विज्ञानाच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात, हे सांगताना त्यांनी हातावरील रेषा किंवा हस्ताक्षराचा अभ्यास करून मुलांची बौद्धिक क्षमता वाढविणारी ‘डेक्तोलोग्राफी’ किंवा सध्या जोरात असलेल्या ‘मिड्ब्रेन अक्टिव्हेशन’चे उदाहरण दिले. अनेक आजार हे दीर्घ मुदतीचे व कधीच बरे न होणारे असतात. त्यामुळे आपल्याला असे आजार झाले आहेत हे न स्वीकारण्याची मानसिकता असते. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती किवा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित संज्ञा घेऊन चुटकीसरशी बरे करणारे हे फसवे उपचार मानवी मनाला लगेच भुलवतात. असे सांगून त्यांनी चुंबक चिकित्सा, सेरोजेम, प्राणिक हिलिंग, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर वैगेरे प्रकारचे उपचार छदमविज्ञानी असल्याचे सांगितले. हे बाजारावर अवलंबून असणारे छदमविज्ञानाचे प्रकार असल्याने मागणी तसा पुरवठा तत्त्वाने यात सतत भरच पडत राहाते व नव्या प्रकारांची निर्मिती होत राहाते, असेही ते म्हणाले.

धर्म आणि छदमविज्ञान यांची अभद्र युती असल्याचे सांगून ते म्हणाले, एकाच वेळेला आपण प्रागतिक आहोत, आधुनिक आहोत, पण त्याचवेळेस आम्ही आमच्या प्राचीन, मूळ संस्कृतीशी कसे जोडले गेले आहोत, हे सिद्ध करण्याच्या मानसिक गरजेतून ही युती घडून येते, याचा प्रत्यय आज आपण घेतच आहोत. डॉक्टर, अनेक वैज्ञानिक ‘गोविज्ञाना’ला बळी पडताना दिसत आहेत. ‘प्राचीन काळात आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होत होती हे गणपतीच्या उदाहरणावरून सिद्ध होते’, या पंतप्रधानांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी केलेला दावाही या मानसिकतेतून केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. छदम विज्ञानाला बळी पडणाऱ्यांची मानसिकता केवळ कठोर चिकित्सेने बदलता येणार नाही, असे सांगून ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे’, हे नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य उदरुधत करत ते म्हणाले, “हे वाक्य जितके अंधश्रद्धा निर्मूलनाला लागू आहे तितकेच छदमविज्ञानालादेखील लागू आहे. ते सामोरे ठेवतच आगामी कालखंडात छदमविज्ञानाच्या विरोधी संघर्षाला अंनिस कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्याख्यानाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या गाण्याने झाली. सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले, तर आभार डॉ. अशोक कदम यांनी मानले. तीन दिवसांच्या छदम विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमालेचा समारोप अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केला.

Web Title: Only scientific approach will get rid of the shackles of deceptive science: Hamid Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.