चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय त्रिसदस्यांपैकी दोनच सदस्य दाखल

By संदीप बांद्रे | Published: October 25, 2023 07:04 PM2023-10-25T19:04:31+5:302023-10-25T19:06:12+5:30

कामाला गती, गर्डर हटवण्यासाठी जोरदार हालचाली

Only two members of the central triumvirate filed for inquiry into the Chiplun flyover accident | चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय त्रिसदस्यांपैकी दोनच सदस्य दाखल

चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय त्रिसदस्यांपैकी दोनच सदस्य दाखल

चिपळूण : कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी आता कामाला गती देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात असून संपूर्ण परिसर लोखंडी पत्र्यांनी बंद करण्यात येत आहे. कोसळलेले गर्डर हटवण्यासाठी देखील जोरदार हालचाली सुरू करण्यात आले असून कामगारांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय समितीतील दोन सदस्य आज, बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता येथे दाखल झाले असून ते उद्या गुरुवारपासून दोन दिवस चौकशी करणार आहेत. त्यामुळे संबधितांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय पर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू असतानाच उड्डाणपुलाचे गर्डर मधोमध तुटून खाली कोसळले. दोन गर्डरसह क्रेन आणि अन्य गर्डरला देखील जबर धक्का बसल्याने झालेल्या कामावरच पूर्णतः प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या दुर्घटनेची राज्य शासनासह केंद्र शासनाने देखील दखल घेतली. राज्य शासनाने तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली असून केंद्र सरकार कडून देखील चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये आयआयटी कंपनीचे रवी सिन्हा, टंडन कन्सल्टन्सीचे मनोघ गुप्ता, हेगडे कन्स्लटन्सीचे सुब्रमन्य हेगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी मनोघ गुप्ता, सुब्रमन्य हेगडे हे दोनच सदस्य दाखल झाले आहेत.

केंद्रीय समिती गुरुवार पासून दोन दिवस संपूर्ण पूल दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तत्पूर्वीच कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पुलाच्या ठिकाणी लोखंडी पत्रे लावून संपूर्ण परिसर बंदिस्त करण्यात येत आहे. त्याशिवाय सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व त्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी कामगारांचा मोठा ताफा देखील येथे आणण्यात आला असून ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिले आहेत.

तुटलेले गर्डर हटवण्यासाठी मातीचा भराव करण्यात येत असून दोन्ही बाजूने हा भराव केला जात आहे. प्रथमतः तुटलेले गर्डर बाजूला करून नंतर वरील क्रेन बाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर पुलाबाबत पुढील निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी हालचाली गतिमान झाले आहेत.

Web Title: Only two members of the central triumvirate filed for inquiry into the Chiplun flyover accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.