सुंदर गावात एकच काम
By admin | Published: February 10, 2016 11:25 PM2016-02-10T23:25:42+5:302016-02-11T00:30:58+5:30
गुहागर तालुका : आढावा सभेत धक्कादायक माहिती उघड
गुहागर : ज्या नळपाणी योजना नियमित चालवल्या जात असतील, अशा नळपाणी योजनांच्या ग्रामपंचायतींना वीजबिलाच्या ५० टक्के अनुदान प्रोत्साहन निधी म्हणून दिला जात आहे. जिल्हा परिषदेतून हे अनुदान गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊनही गेले तीन महिने या निधीबाबत सर्वच ग्रामपंचायती अनभिज्ञ होते. एवढेच नव्हे तर स्मार्ट व्हिलेज म्हणून निवडलेल्या पाच गावांत केवळ एकच काम झाल्याचा प्रकार शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीष शेवडे यांनी गुहागर पंचायत समितीच्या विकासकामांचा घेतलेल्या आढाव्यातून पुढे आला आहे.
शेवडे यांनी गुहागर पंचायत समितीच्या विकासकामांचा आढावा पंचायत समितीच्या सभागृहात घेतला. मार्चअखेर प्रत्येक योजनेवरील निधी खर्च पडावा व जास्तीत जास्त विकासकामे व्हावीत, यासाठी हा आढावा महत्त्वपूर्ण ठरला. यामधून प्रत्येक विभागाची माहिती व निधी अजून का खर्ची पडला नाही, याचे उत्तरही अधिकारीवर्गाकडून मागण्यात आले.
स्मार्ट व्हिलेज म्हणून निवडण्यात आलेल्या ५ ग्रामपंचायतींमध्ये केवळ एकच काम झाल्याने नाराजी व्यक्त करत मार्चअखेर सर्व कामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. तसेच शौचालयाची रक्कम लाभार्थ्यांपर्यंत वेळीच पोच व्हावी, अशी मागणीही करण्यात आली.
जलयुक्त शिवारमधील कामांचाही आढावा घेत कामे लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. वरवेली अंगणवाडीकरिता आलेला निधी वेळीच खर्ची का दाखवण्यात आला नाही. अंगणवाडीची इमारत बांधून पूर्ण झाली असून, त्याला निधी मिळण्यासाठी त्वरित प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. अशा विविध विकासकामांचा आढावा घेत त्याच्या अंमलबजावणीचेही आदेश दिले..
यावेळी जलव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत शिरगावकर, सभापती विलास वाघे, उपसभापती सुरेश सावंत, सदस्य सुनील जाधव, सूचना बागकर, पूनम पाष्टे, भाजप तालुकाध्यक्ष विठ्ठल भालेकर, गटविकास अधिकारी बा. ई. साठे, उपमुख्य कार्यकारी (सामान्य) विश्वास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) सावंत, बांधकामचे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी आदी प्रमुख अधिकारी, गुहागर पंचायत समितीच्या प्रत्येक विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सवालच सवाल : मंजुरीपूर्वीच काम कसे?
गुहागर बाग येथील अंगणवाडीला शिक्षण समितीची मंजूरी नसतानाही बांधकाम का करण्यात आले. पायकामधून तब्बल १०९ शाळांना मैदानासाठी प्रत्येकी १ लाख अनुदान वर्ग झाले. मात्र, एकही काम नाही. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये पडून असलेले हे अनुदान त्वरित खर्ची टाकण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
काजुर्ली नळपाणी योजनेवरील पंप बसवण्याचे काम गेले वर्षभर केले जात असून, संबंधित ठेकेदाराला नोटीस का बजावण्यात आली नाही. मात्र, २५ फेबु्रवारी रोजी कोणत्याही परिस्थितीत पंप बसवून तेथील नळपाणी योजना कार्यान्वित करावी. याच दिवशी मी उद्घाटनाला येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सांगितले.
जागा खाली करा
मुंढर कातकरी शाळा बंद होऊन तीन वर्षे झाली तरी जागामालकाची जागा अडवून का धरण्यात आली आहे. त्यांची जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले.