कणेरीत जुगार खेळताना पाचजणांविरुध्द कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 04:39 PM2019-03-22T16:39:18+5:302019-03-22T16:40:04+5:30
राजापूर : राजापूर पोलीसांनी तालुक्यातील कणेरी गावात जुगार खेळताना पाच जणांविरुध्द कारवाई करताना त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी ...
राजापूर : राजापूर पोलीसांनी तालुक्यातील कणेरी गावात जुगार खेळताना पाच जणांविरुध्द कारवाई करताना त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी टाकलेल्या धाडीत २ हजार ९२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या धडक मोहीमेमुळे तालुक्यातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यातील कणेरी गावी जुगाराचा डाव चालतो, अशी माहिती राजापूर पोलीसांना मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी गुरुवार दिनांक २१ मार्चला सायंकाळी सहाच्या दरम्यान कणेरी येथे धाड टाकली.
त्यावेळी एका ठिकाणी मोकळ्या जागेतील मांडवामध्ये जुगाराचा खेळ सुरु होता. त्यावेळी पोलीसांनी संतोष सुर्यकांत दुधवडकर (४४), महेश सोनु कणेरे (४०), प्रज्ञेश चंद्रकांत बावकर (२४), सुहास मुरलीधर शिरवडकर (५५), संतोष गंगाराम साळवी (५१) अशा एकूण पाचजणांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द कारवाई केली आहे.
पोलीसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे २हजार ९१० रुपये जप्त केले आहेत. त्यामध्ये ५०० रुपयांच्या तीन नोटा, दोनशे रुपयांच्या २, १०० रुपयांच्या ८, ५० रुपयांच्या ३, २० रुपयांच्या ५ व १० रुपयांच्या २ नोटा असा नोटांचा तपशील आहे.
पोलीसांनी गुन्हा दाखल केलेल्या पाच जणांमध्ये एक जण स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याची जोरदार चर्चा कणेरी परिसरात सुरु आहे. याप्रकरणी राजापुर पोलीसांनी पाचही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव अधिक तपास करीत आहेत.