रिफायनरी विरोधात विधानभवनासमोर कोकणच्या आमदारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:29 PM2017-12-14T17:29:20+5:302017-12-14T17:34:38+5:30
राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.
राजापूर : राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.
या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, स्थानिक आमदार म्हणून आमदार राजन साळवी वेळोवेळी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रिफायनरी प्रकल्प रद्द करा, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा अशा घोषणा देत बुधवारी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत ग्रामस्थांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन देत शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाविरोधात निदर्शने केली.
या आंदोलनात शिवसेना विधानसभेचे गटनेते आमदार सुनील प्रभू, शिवसेनेचे कोकण पक्ष प्रतोद आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार भरत गोगावले, आमदार वैभव नाईक, आमदार उदय सामंत, आमदार सुनील शिंंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार तृप्ती सावंत, आमदार मनोहर भोईर, आमदार तुकाराम काटे आदी सहभागी झाले होते.
विधानसभेतही चर्चा
गेले काही दिवस रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची भूमिका संदिग्ध असल्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न उचलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून विधानभवनातही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.