खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी
By Admin | Published: April 7, 2016 11:36 PM2016-04-07T23:36:03+5:302016-04-07T23:57:40+5:30
नेवरे - धामणसे शिक्षण संस्था : आदर्श, बोधवाक्याची जपणूक करत अविरत ४८ वर्षे वाटचाल
मेहरून नाकाडे-- रत्नागिरी -तिन्ही बाजूंनी उंच डोंगर व एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र यांच्यामध्ये वसलेला नेवरे गाव. निसर्गरम्य गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आरेवारे, कोतवडे मार्गापूर्वी निवळीमार्गे गावात एसटी सुरू होती. नेवरे व लगतच्या धामणसे गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा सुरू होती. परंतु सातवीनंतर विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी मुंबई किंवा रत्नागिरीला जावे लागे. ज्यांची सोय होत नसे ते विद्यार्थी कोतवडे गावात पायी जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करीत असत. समाजामध्ये आर्थिक विषमता असताना खेड्यातील तळागाळातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने डॉ. नानासाहेब हर्षे व बलराम मोरे या व्दयींनी काही शिक्षणप्रेमी मंडळींना एकत्र घेऊन ‘नेवरे - धामणसे शिक्षण संस्थे’ची स्थापना केली.
महाभारतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग सांगत असताना ‘कर्मण्ये वाधिकारास्ते मा फलेषु कदाचन’ हा संदेश दिला होता. डॉ. नानासाहेब हर्षे व बलराम मोरे या शिक्षणप्रेमींनी ‘कर्मण्ये वाधिकारास्ते मा फलेषु कदाचन’ नेमके हेच बोधवाक्य घेऊन १९६८मध्ये ‘नेवरे - धामणसे शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. शिक्षण क्षेत्रातील नवनव्या संकल्पनांना आकार देण्यासाठी तसेच गावातील सातवीपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होऊ नये, याचे भान ठेवत संस्थेने इयत्ता आठवीचा वर्ग ९ जून १९६९ला सुरू केला. शासनाकडून १८ मार्च १९६९ रोजी अनुदानावर आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली. सुरुवातीला संस्थेकडे स्वमालकीची इमारत नव्हती. भाड्याच्या जागेत संस्थेने वर्ग सुरू केले. काजिरभाटी येथील नेवरे नंबर १ च्या शाळेत आठवीचा वर्ग भरत होता. परंतु पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता संस्थेने बाजारपेठ परिसरात भाड्याने जागा घेऊन शाळा सुरू केली.
संस्थेने स्वमालकीची इमारत बांधण्यासाठी १९८२मध्ये जागा खरेदी करून नवीन इमारतीची मुहूर्तमेढ रोवली. शाळेने हळूहळू पाचवीपासून दहावीपर्यंतचे वर्ग एकाच शैक्षणिक संकुलात सुरू केले. शाळेने आजही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे शाळेचे काही माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यासह परदेशात उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहेत. हेच येथे ज्ञानार्जन करणाऱ्या मंडळींबरोबर ज्ञानदानाचे व्दार खुले करणाऱ्या संस्था चालकांचे यश म्हणावे लागेल.
गावात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुलांना शहराकडे जावे लागत असे. अनेक इच्छुक मुला-मुलींना शिक्षण थांबवावे लागे. त्यामुळे संस्थेने शाळेचा विस्तार करण्याची योजना आखली. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करतानाच धाडसाने कला व वाणिज्य शाखा सुरू केली. ६ जुलै १९९५पासून मॉसाहेब मीनाताई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी संस्थेने खासदार अनंत गीते यांना साकडे घातले. खासदार निधीतून तीन खोल्यांची इमारत उभी राहिली.
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहिली आहे. उत्कृष्ट ज्ञानदानामुळे सुरुवातीला ७० टक्के असलेला दहावीचा निकाल १०० टक्के पर्यंत जाऊन पोहोचला. मालगुंड पंचक्रोशीत सलग तीन वर्षे दहावीचा उच्चत्तम निकाल लावणाऱ्या शाळेला फिरती ढाल देऊन गौरव करण्यात येतो. नेवरे हायस्कूलने तर सलग तीन वर्षे फिरती ढाल मिळवण्याचा विक्रम केला आहे. शाळेप्रमाणे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रीत केल्यामुळे कला व वाणिज्य शाखांच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिली आहे. ९५ ते ९९ टक्क्यांपर्यंत सातत्याने निकाल असल्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा ओढा या कॉलेजकडे अधिक आहे.
वक्तृत्व, निबंध, लेखन तसेच क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी यश मिळवत असताना राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली आहे. शाळाबाह्य स्पर्धा परीक्षा, व्यवसाय परीक्षेत विद्यार्थी यश संपादन करीत असताना येथील शिक्षकांचेही त्यामागे अविरत कष्ट राहिले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत असताना दरवर्षी सैनिक कल्याण निधी व अंध कल्याण निधी यासाठी भरघोस मदत केली जाते.
विद्यार्थ्यांची गरज व पालकांची मागणी विचारात घेता संस्थेने २०१३ - १४ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरू केले आहे. शाळेत ४७६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, १२ शिक्षक, ४ प्राध्यापक, ४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी विविध शिक्षणप्रेमी मंडळींनी संस्थेकडे ७० हजारांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्याच्या व्याजातून दरवर्षी पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुणात्मक प्रगतीवर बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.
शाळेच्या प्रगतीचा विचार करून उत्तम व्यवस्थापनाबद्दल शाळेला सन १९८१ साली प्रोत्साहनात्मक ग्रँड देऊन शासनाकडून गौरवण्यात आले होते. शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक रावसाहेब शिरोळे व निवृत्त सहाय्यक शिक्षक श्रीराम हर्षे यांना शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संस्थेच्या पूर्वजांचा आदर्श व बोधवाक्याची जपणूक करीत असतानाच शिक्षणाचा वटवृक्ष विस्तारीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती अधिकतम विकसित करण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. शाळेला चांगले पटांगण आहे. येथील विद्यार्थ्यांनी विविध खेळात राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भविष्यात दर्जेदार क्रीडांगण तयार करण्यास प्राधान्य दिले जाईल. याठिकाणी विज्ञान शाखा सुरू करण्याची मागणी आहे. व्यवसायाभिमुख प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यासाठी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीवर विस्तारीत बांधकाम करण्याचा संकल्प आहे. शैक्षणिक कार्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.
- स्वाती आरेकर, अध्यक्ष, नेवरे - धामणसे शिक्षण संस्था, नेवरे.
संस्थेची कार्यकारिणी
४अध्यक्ष - स्वाती आरेकर४उपाध्यक्ष - शरद कापशे
४सेक्रेटरी - संदीप कुळ्ये४सहसेक्रेटरी - उदय आरेकर
४खजिनदार - मुकुंद परांजपे४मुख्याध्यापक - कल्लाप्पा बाळासाहेब रूग्गे.
सदस्य - मनोहर मोरे, दिनानाथ आरेकर, अमोल आरेकर, सुधाकर हळदणकर, अविनाश पेडणेकर, उत्तम मोरे, अनिकेत हर्षे, मनोज हळदणकर, शकील डिंगणकर.