आंबा-काजू नुकसान भरपाई घेण्याची पुन्हा संधी
By admin | Published: July 13, 2017 04:44 PM2017-07-13T16:44:35+5:302017-07-13T16:44:35+5:30
दि. १५ जूलैपूर्वी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
आॅनलाईन लोकमत
लांजा (जि. रत्नागिरी), दि. १३ : शासनाच्यावतीने सन २०१५-१६ मध्ये देण्यात आलेल्या आंबा-काजू नुकसान अनुदानापासून केवळ बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले होते. त्यामुुळे गेले वर्षभर हे अनुदान शासनाकडेच जमा होेते. शिल्लक असलेल्या या अनुदानाचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून, दि. १५ जूलैपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या अचूक बँक खाते क्रमांकाच्या प्रती तलाठी कार्यालयामध्ये जमा करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़
२०१५-१६ साली अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून लांजा तालुक्याला १३ कोटी ६६ लाख ११ हजार ७५० रुपये एवढा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार लांजा महसूल विभागाने तालुक्यातील आंबा-काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या-त्या रकमेचे धनादेश बँकांना अदा करताना लाभार्थी शेतकऱ्यांना रकमेचे वाटप केले होते. मात्र, यावेळी अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने बँकांनी तहसील कार्यालयाकडे सुधारीत यादी मागितली होती. त्यामुळे चुकीचे खाते क्रमांक असणाऱ्या लाभार्थ्यांना आंबा-काजू नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले होते़
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे फळपीक नुकसान अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त झाले असून, या अनुुदानामध्ये मार्च २०१६अखेर समर्पित अनुदान व पुरवणी यादीमधील देय अनुदान रकमेचाही समावेश आहे. लांजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिल्याने तसेच नावातील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात अनुदान शिल्लक राहिले असून, हे अनुदान अजूनही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेले नाही. खाते क्रमांक व नावात त्रुटी असल्याने अनुदान रक्कम खात्यावर न जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लांजा तहसील व तलाठी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या लाभार्थ्यांना आता अंतिम संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, दिलेल्या कालावधीत आपला योग्य खाते क्रमांक न दिल्यास सदरची रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार असल्याचे लांजा तहसीलदार मारुती कांबळे यांनी सांगितले.