सगळ्याच प्रकल्पांना विरोध, ‘त्यां’ना हवंय तरी काय?; एनजीओविरुद्ध आता स्थानिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:34 PM2022-06-10T17:34:33+5:302022-06-10T17:36:17+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना (एनजीओंना) आता राजापूर तालुक्यातील बारसू गावात स्थानिक लोकांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे. या संस्थांमधील काही ठराविक लोक प्रत्येक प्रकल्पालाच विरोध करत असल्याने त्यांच्या या भूमिकेमागे नेमके कोण आहेत, याची शंका आता लोकच घेत आहेत.
तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार आणि परिसरातील १३ गावांमध्ये उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले. मात्र त्याला खूप विरोध असल्याचे चित्र उभे केले गेले. त्यावेळी काही सामाजिक संस्थांनी, विशेषत: त्यातील काही व्यक्तींनी दबावतंत्राचा वापर करून लोकांना प्रकल्पाबाबत भीती दाखवली. देवासमोर नारळ ठेवून लोकांना शपथा घ्यायला लावल्या. त्यामुळे लोकांनी प्रकल्प हवा असूनही, उघडपणे समर्थन केले नाही.
‘आम्ही लोकांच्या बाजूने’ अशी बोटचेपी भूमिका घेत शिवसेनेने या विरोधाची बाजू उचलून धरली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला प्रकल्पाची अधिसूचना रद्द करणे भाग पाडले. आता याच शिवसेनेची भूमिका बदलली आहे. नाणारला प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिलेल्या शिवसेनेने प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्या लोकांची बाजू एकदाही ऐकून घेतली नाही. प्रकल्प विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रकल्पांचे समर्थन करणाऱ्यांना भेटीसाठी वेळही दिला नाही. उलट प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या लोकांना शिवसेनेच्या नेत्यांनी ‘दलाल’ अशा शब्दात हिणवले. तीच शिवसेना आता बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी विशेष पुढाकार घेत आहे.
आता बारसू येथे एमआयडीसी उभारण्यासाठी काही जागा घेतली जात आहे. त्याचे सर्वेक्षण चालू आहे. मुळात नाणारप्रमाणेच बारसू भागातील असंख्य लोकांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी जागा मालकांची संमती आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. पण, त्यात काही एनजीओ बाधा आणत आहेत. स्थानिक लोक प्रकल्पाच्या बाजूने उभे राहत असताना काही स्वयंसेवी संस्थांचे पुढारी त्यात खोडा घालू पाहत आहेत. त्याविरोधात आता ग्रामस्थ ठामपणे उभे राहू लागले आहेत. त्यामुळे अशा पुढाऱ्यांविरोधात पोलिसांकडे अर्जही करण्यात आले आहेत.
लोकांना रोजगार हवा असल्याने आता रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन उघडउघड केले जात आहे. म्हणूनच काही ठराविक लोक ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्याविरोधात स्थानिक लोकच उभे राहत असल्याने या स्वयंघोषित पर्यावरणरक्षकांचे काय होणार आणि जिल्हा प्रशासन, पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एनजीओकडून चर्चाच नाही..
रिफायनरी प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध करणार्या स्वयंसेवी संस्थांनी आतापर्यंत कधीही आपल्या शंका, आक्षेप संबंधित कंपनीसमोर मांडलेले नाहीत. आपण म्हणतो तेच खरे आहे, अशी भूमिका घेत या संस्थांनी कधीही चर्चा करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
सगळीकडे तेच कसे?
ज्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हा जे लोक विरोध करण्यासाठी पुढे होते, तेच लोक नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी उभे राहिले. आता बारसूमध्येही तेच लोक विरोध करत आहेत. त्यांना असे करण्यासाठी कोणाकडून नियुक्त केले गेले आहे का, असा प्रश्नही आता लोक करत आहेत.