पोसरे दुर्घटनेतील १६ मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास विरोध, ही गंभीर बाब : बसपा प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:01+5:302021-08-01T04:29:01+5:30
रत्नागिरी : अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या पोसरे (ता. खेड) येथील मागासवर्गीय समाजातील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा ...
रत्नागिरी : अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या पोसरे (ता. खेड) येथील मागासवर्गीय समाजातील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा दिली नाही, ही बाब गंभीर असून याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी केली आहे. शुक्रवारी त्यांनी या गावाला पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना पक्षाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. पोसरे - बौध्दवाडी आणि आदिवासी वाडीतील कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या संकटात सापडलेल्या चिपळूणला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लवाजम्यासह भेट दिली. परंतु, चिपळूणपासून अगदी ३० किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असलेल्या पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या १६ जणांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का? असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची जातीयवादी मानसिकता दिसून येत असल्याची टीका केली.
अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या या वाडीतील १६ लोकांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागासुद्धा दिली नाही, ही बाब लाजिरवाणी आहे. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झाली आहेत. हे वर्ष आपण स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव म्हणून साजरे करणार आहोत. असे असताना मागासवर्गीयांच्या अंत्यविधीसाठी जागा दिली जात नसेल, तर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी केला. स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्याकडून या मृतांच्या अंत्यविधीसाठी जागा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची जागा अंत्यविधीसाठी देण्यात आली नव्हती. उलट वाडीतील व्यक्तीच यासाठी पुढे आल्याचे ताजने यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत सरकारी नोकरीत समाविष्ट करावे आणि त्याच गावात सर्वांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, जिल्हा प्रभारी सचिन मोहिते, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि गावातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.