विस्थापनामुळे नाणार भागात रिफायनरी करण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:14+5:302021-06-27T04:21:14+5:30

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना ...

Opposition to refinery in Nanar area due to displacement | विस्थापनामुळे नाणार भागात रिफायनरी करण्याला विरोध

विस्थापनामुळे नाणार भागात रिफायनरी करण्याला विरोध

Next

राजापूर : काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसोबतची बांधीलकी जपून आहे. राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना येऊ शकणारी संभाव्य बाधा याचा विचार करून काँग्रेसने स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेता नाणार भागात प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू-सोलगावच्या जागेत रिफायनरी प्रकल्प उभा राहत असल्याने त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.

यापूर्वी मतांच्या आकडेवारीला नगण्य स्थान देत काँग्रेसने अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते. आज अणुऊर्जा प्रकल्पातील ९८ टक्के भूमिपुत्रांनी आर्थिक मोबदला स्वीकारला आहे. मात्र, प्रकल्पांना विरोध करून, मतांची बेगमी करून सत्ता पटकावणारे आजही तालुक्याचा कोणताच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. बारसू-सोलगांवमध्ये सध्या रत्नागिरी रिफायनरी कंपनी जागेचा शोध घेत आहे. या भागात आपल्या माहितीप्रमाणे प्रकल्पाला आवश्यक असलेली तब्बल साडेअकरा हजार एकर जमीन ही कातळपड असलेली आहे. या भागात कोणत्याही घरांचे, बागायतींचे विस्थापन होत नाही. नाणार भागात सर्वच राजकीय पक्षांनी विस्थापनामुळे प्रकल्पाला विरोध केला होता. बारसू-सोलगावसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले समर्थन दर्शवले आहे. तालुक्यातील तब्बल ५० विविध संघटनांनी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांत नकारात्मक भावना निर्माण करण्यात आलेल्या राजापूर तालुक्याचे हे सुबत्तेकडे जाणारे आशादायक पाऊल असल्याचे खलिफे यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस नेते अविनाश लाड यांनी बारसू-सोलगावमध्ये प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही प्रकल्पाबाबत पसरवण्यात येणारे गैरसमज, त्यासाठी घेण्यात येणारा जातीपातीचा आधार हे आता परवडणार नाही, याची खात्री विशेषतः तरुण आणि सुज्ञ तालुकावासीयांना झाल्याने येत्या काळात प्रकल्प होण्यासाठी काँग्रेस जनतेसोबत कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्याचा विकास ही भूमिका घेऊन आपण ग्रामीण भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Opposition to refinery in Nanar area due to displacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.