धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप
By शोभना कांबळे | Published: December 6, 2023 04:35 PM2023-12-06T16:35:09+5:302023-12-06T16:36:30+5:30
रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ...
रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडी पुनर्वसनाचा संकल्प केला. त्यामुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण, त्याला विरोध करणे, म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
देशाच्या मेट्रो सिटीत झोपडपट्टया झाल्या, त्या काँग्रेसच्या काळात. काहीतरी आमिषे दाखवायची, मतदार करून घ्यायचे. नंतर पाच वर्षे प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघायचंही नाही, हे धोरण काँग्रेसने आखले होते. हे बाळासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत अनेक लोक राहतात. काहीतरी धंदे करतात. पण, काँग्रेसी प्रवृत्तीचे असे म्हणणे होते, की या लोकांनी असेच राहायला हवे, फक्त मतदान करायला हवे.
मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्वसनाचा निर्णय घेतला. मात्र, काही कालावधीतच सरकार बदललं. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारमध्ये काँग्रेसही होतं. परंतु, या झोपडपट्टीच पुनर्वसन होऊ नये, यासाठी अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मात्र, आता शिंदे सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. हे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने पारदर्शी होणार आहे. असे असताना मोर्चा काढणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याचा आरोपही सामंत यांनी याप्रसंगी केला.
याच काँट्रॅक्ट अदानीला दिलय म्हणून त्याच्यावर आरोप करून सरकारला बदनाम करायचं, ही काँग्रेसची जुनी फॅशन असल्याचा टोलाही मंत्री सामंत यांनी याप्रसंगी लगावला. काँग्रेसच्या काळात झालं नाही ते आता होतयं. तर त्याचे समर्थन सर्व पक्षांनी करायला हवं, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. धारावीच्या लोकांनीही आपलं भलं कशात आहे, हे पाहायला हवं, असे ते म्हणाले.
सध्या तीन राज्यातील निर्णय लागल्यानंतर काही लोकांना नैराश्य आल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या कामांना विरोध होत असल्याचा आरोपही मंत्री सामंत यांनी यावेळी केला.
मालवण बंदराचा विकास होणार
मालवण बंदर हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासालाही चालना मिळणार आहे. मात्र, तिथल्या शेतकऱ्यांना विश्चासात घेऊनच या बंदराचा विकास होणार आहे. विकास करताना अतिशय पारदर्शीपणे पुढे जाणार असल्याचे सामंत म्हणाले.