सहा तक्रारदारांच्या चौकशीचे ‘महानिरिक्षकां’चे आदेश
By admin | Published: December 22, 2014 12:19 AM2014-12-22T00:19:32+5:302014-12-22T00:19:32+5:30
सॅफरॉन प्रकरण : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तपास
रत्नागिरी : सॅफरॉन कंपनी बंद होण्यास व कोट्यवधींच्या घोटाळ्यास तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक जबाबदार असून, त्याबाबत चौकशी करण्याची मागणी सहाजणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोकण परिक्षेत्र महानिरीक्षकांनी दिले आहेत. तक्रारदार सहाजणांना उद्या, सोमवारी दुपारी १२ वाजता रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १६० नुसार कोकण परिक्षेत्र महानिरीक्षकांनी याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस विभागाला पाठविला आहे. त्यात म्हटले आहे, की सॅफरॉन फसवणूक प्रकरणास तत्कालीन पोलीस निरीक्षकच जबाबदार आहेत, असे निवेदन सहाजणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. त्यानुसार निवेदन देणाऱ्या सहाजणांची चौकशी करून माहिती घेण्यात यावी. याप्रकरणी चौकशीसाठी त्या सहाजणांना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी उद्या त्यांच्या कार्यालयात दुपारी १२ वाजता बोलावले आहे.
या सहाजणांत स्नेहा पिलणकर, प्रीती विरकर, रूपाली मजगावकर, प्रज्ञा चव्हाण, दिनेश ठिक व दीपक नाचणकर यांचा समावेश आहे. तक्रारदारांनी आपल्या निवेदनात तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, एक निरीक्षक व दोन हवालदार यांच्यावर सॅफरॉनबाबत ठपका ठेवला होता. याबाबत सॅफरॉन प्रकरणाच्या होणाऱ्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सत्यता तपासली जाणार
रत्नागिरी परिसरात शशिकांत राणे याने आपल्या सॅफरॉन कंपनीमार्फत दामदुप्पट रक्कम देण्याच्या योजनांचे प्रलोभन दाखवीत कोट्यवधी रुपयांना येथील गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. याप्रकरणात राणे यानेच नंतर काही पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच गुंतवणूकदारांना आपल्या लेटरपॅडवर त्याबाबत काही लेखी मजकूरही दिल्याचा तक्रारदारांचा दावा आहे. त्यामुळे याबाबतची सत्यासत्यता या चौकशीत तपासली जाणार आहे.