रत्नागिरी: ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेचे आयोजन
By मेहरून नाकाडे | Published: November 5, 2022 06:08 PM2022-11-05T18:08:08+5:302022-11-05T18:08:36+5:30
या मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील छात्र सहभागी होणार आहेत.
रत्नागिरी : महाराष्ट्र दोन नेव्हल एनसीसी रत्नागिरी विभागातर्फे ‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिम दि.१५ ते दि.२४ नोव्हेंबर अखेर आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ‘प्लास्टिक मुक्त’ समुद्र किनाऱ्याबाबत पथनाट्याव्दारे संदेश देण्यात येणार असल्याची माहिती कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘कोकण सारथी’ सागरी नौका भ्रमण मोहिमेत एन.सी.सी अधिकारी, २५ मुली व ३५ मुलगे मिळून एकूण ६० छात्र सहभागी होणार आहेत. नौका भ्रमण मोहिम गेली १२ वर्षे आयोजित करण्यात येत आहे. सध्याचे वातावरण, हवामान नौका भ्रमणासाठी अनुकूल असल्याने आयोजन केले आहे. या मोहिमेत २७ फूट सेलिंग व्हेलर तीन बोटी, शिडाच्या नौका, व छात्र सैनिकांच्या सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून एक मोठी मच्छिमार नौका व दोन मध्यम यांत्रिक बोट सहभागी होणार आहेत.
‘कोकण सारथी’ सागरी मोहिमेचा शुभारंभ दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भगवती बंदर येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते वरवडे, वरवडे ते जयगड, जयगड ते तवसाळ व परत, जयगड ते बोऱ्या व परत, जयगड ते दाभोळ, दाभोळ ते धोपावे व परत, दाभोळ ते अंजनवेल-वेलदूर व परत, दाभोळ ते जयगड, जयगड ते काळबादेवी, काळबादेवी ते रत्नागिरी येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी मोहिमेची सांगता होणार आहे.
या मोहिमेत रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी, मुंबई, पुणे, नागपूर येथील नौसेना, स्थलसेना, वायूसेना मधील छात्र सहभागी होणार आहेत. सध्या मिस्त्री हायस्कूल येथे पूर्व सागरी मोहिम कॅम्प सुरू असून राज्यभरातील १२० छात्र सहभागी झाले असून त्यातील ६० छात्रांची निवड ‘कोकण सारथी’ सागरी मोहिमेसाठी केली आहे.
या मोहिमेतंर्गत छात्र सैनिक बंदरांना भेटी देत असताना, सागराच्या पाण्याशी झुंज देत, लाटांचा सामना करीत दर्यावर्दी जीवनाचा अनुभव घेतानाच बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती व समुद्र किनारे स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे कमांडिंग ऑफीसर के. राजेश कुमार यांनी सांगितले.
छात्र सैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसीवृत्तीला चालना देणे त्यासाठी विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे, दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे हा या मोहिमेमागचा उद्देश्य आहे. शिडाच्या बोटीतील केवळ कॅनव्हासच्या शिडाच्या (सेल) माध्यमातून १७७ नॉटिकल मैल व ३३२ किलोमीटर प्रवास केला जाणार आहे. या बोटीला कोणतेही यांत्रीक साधन नसताना केवळ शिडाच्या माध्यमातून भरती, ओहोटी वाऱ्याचा वेग व पाण्याचा प्रवाह याचा अभ्यास करून बोटीच्या माध्यमातून पाण्यावरील धाडसी साहस छात्र सैनिक करून दाखवणार आहेत.