अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:20+5:302021-07-22T04:20:20+5:30
रत्नागिरी : केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारांतील ‘अखिल भारतीय नागरी सेवा ...
रत्नागिरी : केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारांतील ‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनांच्यावतीने त्या-त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी निवड चाचणी घेऊन विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ पाठविला जाताे.
राज्य शासनाकडून सचिवालय जीमखान्याला या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपवली आहे.
टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत आदी खेळ प्रकारांमध्ये अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांतून ज्या खेळाडू, कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे) भरून ते कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एका आगाऊ प्रतीसह पाठवावे, असे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. हे अर्ज व्यवस्थापक, सचिवालय जीमखाना, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत टपालाद्वारे व्यक्तिश: तसेच ई-मेलद्वारे (sachivalayagym@rediffmail.com) पाठवावेत, असे आवाहन मानद महासचिव, सचिवालय जीमखाना यांनी पत्रकाद्वारे केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.