ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:23+5:302021-06-23T04:21:23+5:30
लांजा : येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकरंग महाराष्ट्राचे या तीन दिवसीय कार्यशाळेला मंगळवारपासून प्रारंभ झाला ...
लांजा : येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकरंग महाराष्ट्राचे या तीन दिवसीय कार्यशाळेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. २२ ते २४ जून या कालावधीत ही ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शाहिरांची परंपरा लोक कलाकारांचा इतिहास यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जनरेटर पडून
राजापूर : येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लाखो रुपयांच्या किमतीचा जनरेटर वापराविना पडून आहे. सुमारे आठ वर्षांपासून पडून असलेल्या या जनरेटरचा वापर होत नाही तर त्याची खरेदी करून शासनाचा पैसा का वाया घालविला, असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
निर्बंध अधिक कडक
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील काही गावे खबरदारीची उपाययोजना म्हणून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सोमवारपासून या गावांमधील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. शास्त्री पुलाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अंतर्गत मार्ग बंद केला आहे. कसबा, नावडी, माभळे या गावातील ग्रामस्थांवर अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
घाट असुरक्षित
रत्नागिरी : ऐन पावसाळा सुरू होताच निवळी - बावनदी घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी अधिक धोकादायक ठरणार आहे. या घाटाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार न घेतल्यास या प्रकारांमध्ये अधिक वाढ होणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीप जनसेवा समितीतर्फे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा सुरू आहे. मार्गताम्हाने खुर्द येथे झालेल्या या कार्यक्रमात दीप जनसेवा समितीतर्फे ३५ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शेतकरी समाधानी
साखरपा : आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मृग नक्षत्रातच येथील शेतकऱ्यांनी लावणीला प्रारंभ केला आहे. यंदा तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस आधी सुरू झाल्याने लावणीची कामे काही भागात लवकर झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू
देवरूख : येथील आगारातून लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या मार्गावर एस. टी.च्या ४१ फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार या आगाराने लांब पल्ल्याच्या एस. टी. फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
हळद लागवड प्रात्यक्षिक
दापोली : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने शहरानजीकच्या कोकंबा आळी येथील ऋता भागवत यांच्या क्षेत्रावर अखिल भारतीय समन्वित मसाला पिके संशाेधन योजनातर्फे पाच गुंठे जागेत हळद लागवड प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. असोंड येथील प्रक्षेत्रावर चार लाख रोपे तयार करण्यात आली आहेत.
ओबीसींची निदर्शने
राजापूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा शासनाकडून दुर्लक्षित झाला आहे. सरकारने हे आरक्षण पुन: प्रस्थापित करावे तसेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ २४ जून रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील तहसील कचेऱ्यांवर निदर्शने करण्यात येणार आहेत.
नागरिक धास्तावले
खेड : देशात कोरोनाची तिसरी लाट येणार, असे जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे पाच रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने आता जिल्हावासीयांची भीती अधिक वाढली आहे. त्यामुळे नागरिक अधिक सतर्क होऊ लागले आहेत.